सातारच्या कृषी महोत्सवात दीड कोटींचा रेडा; वीस पुरस्कार प्राप्त गजेंद्रन ठरला नागरिकांचे विशेष आकर्षण

साता-यातील कृषी प्रदर्शनात चक्क दीड कोटींचा रेडा प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे. या रेड्याला पाहण्यासाठी सातारकरांनी तुफान गर्दी केली आहे. तब्बल वीस पुरस्कारांनी प्राप्त असलेला सहा वर्षाचा हा गजेंद्र रेडा आहे. 

    सातारा : साता-यातील कृषी प्रदर्शनात चक्क दीड कोटींचा रेडा प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे. या रेड्याला पाहण्यासाठी सातारकरांनी तुफान गर्दी केली आहे. तब्बल वीस पुरस्कारांनी प्राप्त असलेला सहा वर्षाचा हा गजेंद्र रेडा आहे.

    कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील मंगसुळी येथील विलास गणपती नाईक या मालकांचा हा सहा वर्षाचा रेडा पंजाब मधून आणलेल्या म्हशीपासून सहा वर्षांपूर्वी जन्माला आला. एक लाख ४० हजाराच्या किमतीला आणलेल्या म्हशीपासून हा गजेंद्र नावाचा रेडा झाला आणि नाईक परिवाराचे भाग्यच बदलले. महाराष्ट्र, कर्नाटक यासारख्या राज्यातील सुमारे वीस हुन अधिक प्रदर्शनात लक्षवेधक ठरलेला हा गजेंद्र नावाचा रेडा महाराष्ट्र, कर्नाटक हिंदकेसरी पुरस्काराने ही सन्मानित झाला आहे.

    दररोज १५ लिटर दूध पिणारा चार किलो पेंड खाणारा, तीन किलो गव्हाचा आटा खाणारा हा धष्टपुष्ट गजेंद्र दररोज तीन किलो सफरचंद फळे ही खातो. ऊस, वैरण, उसाचे वाड, पाचट यासारख्या खाद्यपदार्थांना शुद्ध शाकाहारात स्वीकारणारा गजेंद्र दीड टनाचा वजनाचा असल्यामुळे ट्रकमधून प्रदर्शनासाठी दाखल झाला आहे. नाईक परिवाराकडे सध्या पन्नास म्हशी असून दररोज दीडशे लिटर दूध ते विक्री करतात.

    सोमनाथ शेटे यांच्याकडून विविध प्रदर्शनात गजेंद्रला प्रदर्शनासाठी आणले जाते. सातारा जिल्ह्यातील अनेक अनेक नागरिकांनी बुधवारी सकाळपासूनच गजेंद्रला पाहण्यासाठी गर्दी केली होती. धष्टपुष्ट असा हा गजेंद्र सर्वांचे आकर्षण ठरत आहे. शेकडो युवकांच्या मोबाईलमध्येही तो आपल्या वेगवेगळ्या पोजनी कॅमेऱ्याला सामोरे जात आहे.