ज्यादा पैशांच्या आमिषाने रक्कम गुंतवत गेली अन् फटका बसला; सायबर गुन्हेगाराकडून तरुणीला 10.63 लाखांचा गंडा

मोहात अडकलेल्या एका तरुणीने वडिलांच्या सेवानिवृत्तीचे मिळालेले 10.63 लाख रुपये गमावले. लाभ मिळेल या आशेवर ती रक्कम गुंतवत गेली मात्र तिला काहीही मिळाले नाही. शेवटी तिने एमआयडी पोलिसात तक्रार दाखल केली.

    नागपूर : मोहात अडकलेल्या एका तरुणीने वडिलांच्या सेवानिवृत्तीचे मिळालेले 10.63 लाख रुपये गमावले. लाभ मिळेल या आशेवर ती रक्कम गुंतवत गेली मात्र तिला काहीही मिळाले नाही. शेवटी तिने एमआयडी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी हर्षा समुद्रवार (23) रा. शुभलक्ष्मीनगर, वानाडोंगरीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

    हर्षा ही बीएसस्सीची विद्यार्थिनी आहे. तिला तीन बहिणी आहेत. वडील दोन वर्षांपूर्वी चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीच्या वेळी मिळालेली रक्कम त्यांच्या बँक खात्यात होती. त्यांना एटीएम हाताळता येत नसल्याने बँकेचा व्यवहार हर्षा सांभाळीत होती. दरम्यान 27 सप्टेंबर रोजी हर्षा घरी हजर असताना तिच्या मोबाईलवर मॅसेज आला. सायबर गुन्हेगाराने तिला क्रीशा 8332 या टेलिग्राम आयडीवरून डेली वर्किंग व्हीआयीपी ग्रूपमध्ये ज्वॉइन केले.

    त्यानंतर सायबर गुन्हेगाराने हर्षाला एका लाईकचे 25 रुपये या प्रमाणे लाभ दिला. ती वेळेच्या आत काम करीत असल्याने तिला लाभ मिळत गेला. तिच्या बँक खात्यात पैसे जमा होत असल्याने तिचा विश्वास बसला. यानंतर तिला गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. जेवढी जास्त रक्कम गुंतवणूक कराल तेवढा जास्त लाभ मिळेल असे आमिष देण्यात आले. हजारचे 1300 नंतर तीन हजाराचे 3,900 मिळाले. व्हीआयपी अॅपवरील गुंतवणूकदार स्क्रीन शॉट पाठवून लाखांत लाभ मिळाल्याचे सांगत होते.

    मोहात अडकलेल्या हर्षाने वडिलांच्या बँक खात्यातील सर्व रक्कम गुंतविली. मात्र, लाभाची रक्कम केवळ ऑनलाईन दिसत होती. रक्कम काढण्यासाठी आधी लाखात रक्कम भरा, असे सांगितले जायचे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलिस ठाणे गाठले. उपनिरीक्षक आशिष जाधव यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.