मंगळवेढा बंदला १००टक्के प्रतिसाद ; कुठेही अनुचित प्रकार न घडता बंद शांततेत पार पडला

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या उपोषण कार्यकर्त्यावर पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठीमार व गोळीबार प्रकरणी त्यांचा निषेध करण्यासाठी मंगळवेढा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या बंदला व्यापार्‍यांनी १०० टक्के आपले व्यवसाय बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. दरम्यान यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या.

    मंगळवेढा:  जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या उपोषण कार्यकर्त्यावर पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठीमार व गोळीबार प्रकरणी त्यांचा निषेध करण्यासाठी मंगळवेढा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या बंदला व्यापार्‍यांनी १०० टक्के आपले व्यवसाय बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. दरम्यान यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या.

    -शहरात बंदमुळे रस्त्यावर शुकशुकाट
    अंतरवाली सराटी जि.जालना येथे मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषण सुरू होते. हे उपोषण मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज व हवेत गोळीबार केल्याने अनेक उपोषणकर्ते जखमी झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यभर संतापाची लाट मराठा समाजातून उसळली असून याचा निषेध करण्यासाठी मंगळवेढा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने बंदची हाक दिली होती. या हाकेला शहर व ग्रामीण भागातील व्यवसायिकांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद दिल्याने १०० टक्के व्यवहार ठप्प झाले होते. परिणामी शहरात बंदमुळे रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता.

    शहरामध्ये एकही दुकान दिवसभर उघडले गेले नाही. मेडीकल, दवाखाने, दुध डेअरी, पाणी फिल्टर या मानवी जीवनाशी निगडीत असणार्‍या अत्यावश्यक सेवा बंदमधून वगळण्यात आल्या होत्या. मंगळवेढा बंदची हाक शनिवारी दिल्यामुळे रविवारी ग्रामीण भागातून अनेक लोकांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले. या बंदचा एस.टी.वाहतुकवरही परिणाम झाला असून जवळपास बोरीवली, पुणे, कुर्ला, आळंदी या सकाळच्या वेळीतलच केवळ गाडया सुटू शकल्या. तदनंतर मात्र आगाराच्या बाहेर एकही एस.टी. रस्त्यावर धावू शकली नसल्याचे चित्र होते. महामंडळाच्या सगळया बसेस आगारात एकाच ठिकाणी उभ्या असल्याचे दिसून येत होते. दैनंदिनी मंगळवेढा आगाराच्या ५८ बसेस धावत असतात. मात्र या बंदमुळे गेल्या दोन दिवसात एस.टी.ला जवळपास सहा लाखाचा फटका बसला असल्याचे एस.टी.कडून सांगण्यात आले.

    आगारातून निजामाबाद व नगर येथे शनिवारी गेलेल्या एस.टी.बसेस विविध ठिकाणी झालेल्या रास्ता रोकोमुळे अडकून पडल्याने त्या परत येवु शकल्या नाहीत. बंद दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी नयोमी साटम, डी. वाय. एस. पी. विक्रम गायकवाड यांनी शहरात दामाजी चौक, शिवप्रेमी चौक, मुरलीधर चौक, बोराळे नाका येथे फिक्स पॉईंट उभे करून पोलिस नेमले होते. तसेच ग्रामीण भागातील पोलिस दूरक्षेत्रात चोख पोलिस बंदोबस्त नेमला होता. शहर व ग्रामीण भागात फिरते पोलिस पथक गस्त घालत असल्याने बंद दरम्यान कुठेही अनुचित प्रकार न होता शांततेत बंद पार पडला.