विजेच्या धक्क्याने ११ गणेशभक्त जखमी; जनरेटरमधील वायर तुटल्याने दुर्घटना

पनवेलमध्ये विजेच्या धक्क्याने ११ जण जखमी झाले. यामध्ये दोन रहिवासी गंभीर असून आठ रहिवाशांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, दोन जणांना लाईफलाईन हॉस्पिटल आणि एक रहिवासी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. तसेच, जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

    मुंबई : पनवेल (Panvel) कोळीवाडा येथे गणेश विसर्जन (Ganesha Immersion) घाटावर जनरेटरमधील वायर तुटून तब्बल ११ गणेशभक्तांना विजेचा झटका (Electric Shock) बसला आहे. काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींमध्ये चिमुरड्यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

    पनवेलमधील वडघर कोळीवाडा येथील विसर्जन घाटावर गणेशभक्तांच्या सोयीसाठी जनरेटरची (Generator) व्यवस्था करण्यात आली होती. घटना घडली तेव्हा जोरदार पाऊसही (Heavy Rain) सुरु होता. त्यामुळे जनरेटरची एक वायर तुटून एका तरुणाच्या अंगावर पडली. यावेळी त्याला शॉक लागला. त्याला पाहून कुटुंबीयांनी मदत करण्यासाठी त्याला स्पर्श केला. यावेळी कुटुंबीयांनाही विजेचा धक्का बसला.

    पनवेलमध्ये विजेच्या धक्क्याने ११ जण जखमी झाले. यामध्ये दोन रहिवासी गंभीर असून आठ रहिवाशांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, दोन जणांना लाईफलाईन हॉस्पिटल आणि एक रहिवासी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. तसेच, जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

    दरम्यान, जखमींमध्ये हर्षद पनवेलकर (वय ३२), मानस कुंभार (वय १७), रुपाली पनवेलकर (वय ३५), रितेश पनवेलकर (वय ३८), निहाल चोणकर (वय ५), सर्वेम पनवेलकर (वय १५), दिलीप पनवेलकर (वय ६५), दिपाली पनवेलकर (वय २४), वेदांत कुंभार (वय १८), दर्शना शिवशिवकर (वय ३६), तनिष्का पनवेलकर (वय ९ महिने) यांचा समावेश आहे. गणपती विसर्जनावेळी अपघात घडल्याने महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी, पालिका प्रशासनाने धावाधाव करुन भाविकांना वेळीच उपचारासाठी दाखल केले.