११ लाख पुणेकरांनी बजावला मतदानाचा हक्क; आता जिंकण्यासाठी हवीत साडे पाच लाख मतं

पुणे शहर लाेकसभा मतदारसंघात जाे उमेदवार साडे पाच लाख मते मिळवेल ताे विजयी ठरेल. जिल्हा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार ११ लाख ३ हजार ६७८ इतके मतदान झाले आहे. पुण्यातील लढत ही दुरंगीच हाेणार असल्याने जाे उमेदवार किमान पन्नास टक्के मते मिळवेल ताे विजयी हाेईल असे चित्र आहे.  

  पुणे : पुणे शहर लाेकसभा मतदारसंघात जाे उमेदवार साडे पाच लाख मते मिळवेल ताे विजयी ठरेल. जिल्हा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार ११ लाख ३ हजार ६७८ इतके मतदान झाले आहे. पुण्यातील लढत ही दुरंगीच हाेणार असल्याने जाे उमेदवार किमान पन्नास टक्के मते मिळवेल ताे विजयी हाेईल असे चित्र आहे.
  पुण्यात यावेळी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या सरळ सामना असणार आहे. गेली दहा वर्षे भाजपच्या ताब्यात असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी, महायुती, वंचित बहुजन आघाडी तसेच एमआयएमकडूनही उमेदवार उभे करण्यात आले होते. पुणे लोकसभा मतदारसंघातील अंतिम आकडेवारीनुसार, पुण्यात ११ लाख ३ हजार ६७८ मतदान झाले आहे. यात विजयासाठी उमेदवारास सुमारे साडेपाच लाख मतांची गरज असणार आहे.
  २०१९ मध्ये पुणे लोकसभा मतदारसंघात १० लाख ३४ हजार १५४ मतदान झाले होते. त्यामुळे गेल्या निवडणूकीच्या तुलनेत यंदा ६९ हजार ५२४ जादा मतदान झाले असून, या मतदानाचा फायदा नेमका कोणाला होणार, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मागील निवडणुकीत भाजपचे गिरीश बापट यांना ६ लाख ३२ हजार ८३५ मते मिळाली होती. ते ३ लाख २५ हजार मतांनी विजयी झाले होते.
  लोकसभेच्या अंतिम आकडेवारीनुसार, २०१९ च्या तुलनेत शहरातील कसबा, कोथरूड, कॅन्टोन्मेंट,पर्वती आणि वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात मतदान वाढले आहे. हे मतदान कोणत्या उमेदवाराला विजयाच्या दारात घेऊन जाणार याबाबत उत्सूकता निर्माण झाली आहे. या सहा विधानसभा मतदासंघापैकी कसबा मतदारसंघात स्वत: रवींद्र धंगेकर हे आमदार असून उर्वरीत ४ मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर वडगाव शेरीत राष्ट्रवादी काॅग्रेसचा आमदार असून ते महायुतीत आहेत.
  २०१९ मध्ये वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात २ लाख ६ हजार १६९ मतदान झाले होते. २०१४ मध्ये हे मतदान तब्बल ३५ हजारांनी वाढले असून या निवडणूकीत २ लाख ४१ हजार ८१७ मतदान झाले आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये २ लाख ५२६ मतदान झाले होते, या निवडणूकीत हा आकडा २ लाख१७ हजार ४५५ झाला आहे.
  कसबा विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये १ लाख ६१ हजार १५१ मतदान झाले होते. या वर्षी हे मतदान १ लाख ६४ हजार १०५ झाले आहे. तर पर्वती मतदान संघात २०१९ मध्ये १ लाख ८३ हजार ३१० मतदान झाले होते. या निवडणूकीत ते १ लाख ८९ हजार १८४ झाला आहे.
  २०१९ मध्ये कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात १ लाख ४० हजार ३६४ मतदान झाले होते. यात वाढ होत या निवडणूकीत १ लाख ४९ हजार ९८४ मतदान झाले आहे. तर शिवाजीनगर मतदानसंघात मतदान घटले असून २०१९ मध्ये १ लाख ४२ हजार २९९ मतदान झाले होते. ते या निवडूकीत १ लाख ४१ हजार १३३ झाले.
  सर्वच मतदारसंघात लावली ताकद
  मागील निवडणुकीत गिरीश बापट यांना सर्वच सहा विधानसभा मतदारसंघांत मताधिक्य मिळाले होते. मात्र, मागील वर्षी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यामुळे यावेळी सर्वच मतदारसंघांत ताकद लावली असून, निवडणुकीत चुरस आणली आहे.