पुणे जिल्ह्यातील ११ तालुके दुष्काळी घोषित; कोणत्या तालुक्यांचा यादीत समावेश?

राज्य सरकारने जिल्ह्यातील ३१ महसूल मंडळांचा दुष्काळाच्या यादीत मुळशी, वेल्हे हे दोन तालुके वगळता अन्य सर्व तालुक्यांमधील महसूल मंडळांचा समावेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ११ तालुके दुष्काळी म्हणून घोषित झाले आहेत.

    पुणे : पुणे जिल्ह्यात यापूर्वी केंद्राच्या निकषानुसार बारामती, पुरंदर हे दोन तालुके पूर्णतः, तर इंदापूर, शिरूर आणि दौंड तालुक्यांत अंशतः दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकारने जिल्ह्यातील ३१ महसूल मंडळांचा दुष्काळाच्या यादीत मुळशी, वेल्हे हे दोन तालुके वगळता अन्य सर्व तालुक्यांमधील महसूल मंडळांचा समावेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ११ तालुके दुष्काळी म्हणून घोषित झाले आहेत.

    दुष्काळ जाहीर केलेल्या ठिकाणी ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, अशा गावांचा समावेश करण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या तुलनेत ७५ टक्के कमी पाऊस झाल्याने या गावांना टंचाईसदृश म्हणजेच दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

    मावळातील तळेगाव दाभाडे, भोरमधील भोर, संगमनेर, आफ्टळे, वेळू, किकवी, खेडमधील वाडा, आळंदी, चाकण, पाईट, कडूस, कनेरसर, पिंपळगावतर्फे खेड, राजगुरुनगर, आंबेगावातील मंचर, पारगाव, कळम, घोडेगाव, जुन्नरमधील निमगाव सावा, बेल्हे, वडगाव आनंद, नारायणगाव, जुन्नर या मंडळांचा समावेश आहे. यासह पुणे शहर, हवेलीतील खेड शिवापूर, उरुळी कांचन, थेऊर, खडकवासला, वाघोली, हडपसर, कळस, चिंचवड आणि भोसरी या महसूल मंडळांचाही दुष्काळाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.