
वेकोलीच्या सिल्लेवाडा कोळसा खाणीच्या सिम 2 आणि सेक्शन 6 मध्ये स्फोट झाला आहे. स्फोटात जखमी झालेल्या 11 कामगारांपैकी सहा जण गंभीर जखमी आहेत.
नागपूर: नागपूर (Nagpur News) जिल्ह्यातील सिल्लेवाडा कोळसा खाणीत भीषण स्फोट (Sillewada Coal Mine Blast) झाला आहे. या स्फोटात 11 कामगार जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. वेकोलीच्या सिल्लेवाडा कोळसा खाणीच्या सिम 2 आणि सेक्शन 6 मध्ये स्फोट झाला आहे. स्फोटात जखमी झालेल्या 11 कामगारांपैकी सहा जण गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर नागपुरात (Nagpur) उपचार सुरू आहे.
का झाला स्फोट?
खाणीतील कोळसा संपल्यावर ती जागा रेती किंवा भिंत बांधून बंद करण्याची गरज असते. तसं केलं नाही तर त्या पोकळीत वायू साचतो. हा वायू ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यानंतर मोठा स्फोट होतो. सेक्शन 6 मध्ये कोळसा काढल्यावर कोळश्याच्या खाणीतील जागा महिनाभरापासून बंद केलेली नव्हती. त्यामुळं त्यातील वायूचा ऑक्सिजनशी संपर्क आल्याने हा स्फोट झाल्याचं सांगितलं जात आहे.
दीड वर्षांपूर्वी घडली होती अशीच घटना
जखमी झालेल्यांमध्ये अमोल बोधले, कुलदीप उईके, अनिलसिंग ट्रेनी, विलास मुडे, राजू हवेली मिसरी, महिपाल श्री, योगेश्वर, रामचंद्र पाल, निरंजन यांचा समावेश आहे. त्यांच्यावर वलनी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान यापैकी सहा कामगार हे स्थायी कर्मचारी तर चार हे वेकोलीत कंत्राटी पद्धतीने कामाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेनंतर बरीच तारांबळ उडाली असली तरी वेकोलीच्या वतीने या संदर्भात अधिकृतपणे काहीही सांगण्यास कुणीही समोर आलं नाही. सिल्लेवाडा भूमिगत खाण अतिशय जुनी आहे. या खाणीत दीड वर्षांपूर्वी देखील अशीच एक घटना घडली होती. कामगारांना पुरेशी सुरक्षा साधने उपलब्ध नसल्याचा मुद्दा यानिमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे. यावर आता प्रशासन काय कारवाई करणार हे पाहावं लागेल.