BMC Notice To Mumbai Metro : मुंबई मेट्रोकडे मालमत्ता कराची ११७ कोटी थकीत; मुंबई महापालिकेकडून नोटीस

मुंबई महापालिकेला जकात करामधून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत होता. मात्र आर्थिक स्त्रोत असलेला जकात कर रद्द होऊन जीएसटी कर लागू झाला. त्यामुळे पालिकेने आपले उत्पन्न वाढवण्यासाठी मालमत्ता कर वसुलीकडे विशेष लक्ष दिले आहे. मालमत्ता कर न भरणाऱ्या संस्था, व्यक्ती यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

    मुंबई : मुंबई मेट्रोने (Mumbai Metro) २०१३ पासून मालमत्ता कराचे (Property Tax) ११७ कोटी ६२ लाख रुपये थकविले आहे. ही रक्कम भरण्यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या (BMC) अंधेरीतील के-पूर्व आणि के-पश्चिम विभाग कार्यालयातील करनिर्धारण व संकलन विभागाने मुंबई मेट्रोला नोटीस (Notice) बजावली आहे. अंधेरीच्या के-पूर्वच्या हद्दीत सहा, तर के-पश्चिमच्या हद्दीतील पाच मालमत्तांचा यात समावेश आहे.

    मुंबई महापालिकेला जकात करामधून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत होता. मात्र आर्थिक स्त्रोत असलेला जकात कर रद्द होऊन जीएसटी कर लागू झाला. त्यामुळे पालिकेने आपले उत्पन्न वाढवण्यासाठी मालमत्ता कर वसुलीकडे विशेष लक्ष दिले आहे. मालमत्ता कर न भरणाऱ्या संस्था, व्यक्ती यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

    मुंबई मेट्रोने २०१३ पासून आतापर्यंत ११७ कोटी ६२ लाख रुपये मालमत्ता कर थकविला आहे. हा कर भरण्यासाठी पालिकेने मेट्रोला नोटीस बजावली आहे. नोटीस बजावलेल्या मालमत्तांमध्ये आझादनगर मेट्रो स्थानक, डी. एन. नगर मेट्रो स्थानक, वर्सोवा मेट्रो स्थानक, एलआयसी अंधेरी मेट्रो स्थानक, पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्थानक, जे. बी. नगर मेट्रो स्थानक, एअरपोर्ट रोड मेट्रो स्थानक, मरोळ मेट्रो स्थानक या आठ स्थानकांचा समावेश आहे.

    थकीत मालमत्ता कर २१ दिवसांत भरण्याचे निर्देश

    मालमत्ता कराची थकीत रक्कम २१ दिवसांमध्ये भरण्याचे निर्देश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत. या कालावधीत थकबाकीची रक्कम पालिकेकडे जमा न केल्यास या मालमत्तांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल असे नोटीसीत म्हटले आहे.