gujrats boat at devgadh beach

देवगड बंदरात (Devgad Port) गुजरातमधील (Gujrat) ११९ मच्छीमारी नौका (119 Fishing Boats) आश्रयाला आल्या आहेत. बाहेरच्या मच्छीमारी नौका बंदरात आश्रयाला आल्याने स्थानिक सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.

    सिंधुदुर्ग : अरबी समुद्रातील वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील (Kokan) सर्वात सुरक्षित असणाऱ्या देवगड बंदरात (Devgad Port) गुजरातमधील (Gujrat) ११९ मच्छीमारी नौका (119 Fishing Boats) आश्रयाला आल्या आहेत. बाहेरच्या मच्छीमारी नौका बंदरात आश्रयाला आल्याने स्थानिक सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. बंदरात आलेल्या मच्छीमारी नौकांच्या नोंदी ठेवण्याबरोबरच त्यावरील मच्छीमारांची माहिती घेण्याचे काम सुरक्षा यंत्रणेकडून सुरू होते. वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसामुळे मासेमारीमध्ये व्यत्यय आला आहे. समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यावर गुजरात, केरळ आणि तामिळनाडू याठिकाणच्या बोटी कायम आश्रयाला देवगड बंदरात येत असतात.

    देवगड तालुक्याच्या किनारपट्टी भागात काल सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या. किनारपट्टीवरील पावसाळी वातावरणामुळे येथील बंदरात सुरक्षितता म्हणून आश्रयाला आलेल्या गुजरातमधील मच्छीमारी नौकांमध्ये वाढ झाली आहे. आजपर्यंत सुमारे ११९ मच्छीमारी नौका बंदरात आश्रयाला दाखल झाल्या आहेत.

    गेले दोन दिवस येथील वातावरण पावसाळी बनले होते. त्यातच आज दुपारनंतर हलक्या पावसाला सुरुवात झाली. सुरक्षितता म्हणून येथील बंदरात कालपर्यंत गुजरातमधील सुमारे १०८ मच्छीमार नौका आश्रयाला आल्या होत्या. त्यामध्ये आता आणखी ११ नौकांची भर पडली. त्यामुळे आजपर्यंत एकूण ११९ मच्छीमारी नौका आश्रयाला आल्या आहेत. त्यावर सुमारे ९९३ मच्छीमार असल्याची माहिती सागरी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र साळुंखे यांनी दिली.