अकरावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; पुण्याच्या वाघोलीतील घटना

वाघोलीत अकरावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येमागचे कारण मात्र, समजू शकले नाही.

    पुणे : वाघोलीत अकरावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येमागचे कारण मात्र, समजू शकले नाही. अजय विश्वनाथ पवळे (वय १६, रा. अनुसया पार्क, वाघोली) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, वाघोलीतील अनुसया पार्कमध्ये पवळे कुटुंब राहायला आहे. अजय एका महाविद्यालयात अकरावीत होता. सोमवारी दुपारी घरात कोणी नसताना अजयने गळफास घेऊन आत्महत्या केली. अजयची आई सायंकाळी कामावरुन परत आली. तेव्हा त्यांना अजयने आत्महत्या केल्याचे आढळून आले. याघटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

    अजयने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली नव्हती. त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. अजयने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांना धक्का बसला आहे. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. लोणीकंद पोलीस तपास करत आहेत.