तासगावमध्ये १२ बेदाणा व्यापाऱ्यावर बंदी; ‘या’ कारणामुळे केली कारवाई

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडतदारांचे तब्बल एकवीस लाख रुपये थकविल्याप्रकरणी तसेच बाजार समितीने मागितलेली माहिती न दिल्याप्रकरणी 12 बेदाणा व्यापाऱ्यांंना बॅन करण्यात आले आहे.

    तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडतदारांचे तब्बल एकवीस लाख रुपये थकविल्याप्रकरणी तसेच बाजार समितीने मागितलेली माहिती न दिल्याप्रकरणी 12 बेदाणा व्यापाऱ्यांंना बॅन करण्यात आले आहे.
    तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही हजारो कोटींची रुपयांची उलाढाल करणारी मोठी बाजारपेठ आहे. याठिकाणी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यासह परराज्यातूनही व्यापारी येतात. मात्र येथीलच काही व्यापारी पैसे बुडवणे, वेळेत देण्यास टाळाटाळ करणे असे प्रकार करत असल्याचे बाजार समितीच्या निदर्शनास आले.

    बाजार समितीमध्ये एकुण 66 अडते आहेत. त्यांनी एकुण 148 परवाणे काढले आहेत. आठवड्यामध्ये एकुण तीन सौदे निघतात. यामध्ये सरासरी 119 सौदे रोज निघतात. दिवाळीपूर्वी झालेल्या व्यवहाराचे पैसे दिवाळीमध्ये देण्याचे आदेश काढल्यानंतरही सात व्यापार्‍यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. दरम्यान बाजार समितीने सौद्यामध्ये सहभागी होण्यास बॅन केल्यानंतर दोन व्यापार्‍यांनी तात्काळ पैसे भरले. यानंतर महावीर ट्रेडर्स -दोन लाख 66 हजार 440 रुपये, स्वामी समर्थ ट्रेडर्स -13 लाख 75 हजार 571, विजय एक्सपोर्ट – 19 हजार 850, अद्वैत ट्रेडर्स – 57 हजार 988 तर अर्णव ट्रेडर्स यांनी 3 लाख 56 हजार 166 रुपये थकवले आहेत.

    हे पैसे अडतदारांना दिल्यानंतर शेतकर्‍यांना मिळणार असल्याने शेतकरी हिताविरोधी भूमिका असलेल्या व्यापाऱ्यांना बॅन करण्यात आले असल्याचे बाजार समितीमधून सांगण्यात आले. दरम्यान यांना पैसे पूर्ण देईपर्यत बॅन करण्यात आले आहे. याचंसोबत बाजार समितीने दुकानदारांकडून मागितलेली माहिती न दिल्याप्रकरणी भगवानदास खिवराज भंडारी, आदित्यसाई सेल्स कार्पोरेशन, जयश्री ट्रेडर्स, ॠषीकेश ट्रेडर्स, यश ट्रेडर्स, शिवशक्ती ट्रेडर्स व श्रीराम ट्रेडर्स या सात दुकानदारांना माहिती देईपर्यत सौद्यामध्ये खरेदी विक्रीसाठी बॅन करण्याात आले आहे. दरम्यान बाजार समितीने घेतलेल्या या भूमिकेचे कौतूक होत आहे.