छत्रपती कारखान्यात १२ लाख ५१,७९५ मे. टन ऊसाचे विक्रमी गाळप

भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपति सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१-२०२२ या गळीत हंगामाची आज (दि. ११) यशस्वी सांगता झाली असून, कारखान्याने २०० दिवसात १२ लाख ५१ हजार ७९५ मे. टन उसाचे गाळप पूर्ण करून १३ लाख ६८ हजार ९०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

  बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१-२०२२ या गळीत हंगामाची आज (दि. ११) यशस्वी सांगता झाली असून, कारखान्याने २०० दिवसात १२ लाख ५१ हजार ७९५ मे. टन उसाचे गाळप पूर्ण करून १३ लाख ६८ हजार ९०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

  तसेच सहवीज निर्मिती प्रकल्पातून ६,७०,६९,६०० युनिटस् वीज निर्मिती झाली आहे व त्यापैकी अंतर्गत विजेचा वापर वजा जाता ४,३५,९६,००० युनिटस् वीज निर्यात करण्यात आली आहे. याबाबतची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी दिली.

  छत्रपती कारखान्याच्या स्थापनेस ६६ वर्षे पूर्ण झाली असून, कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच १२,५१,७९५ मे. टन उच्चांकी गाळप झाले आहे. यावर्षी वेळेवर व चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाच्या उपलब्धतेत झालेली वाढ विचारात घेऊन १२ लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट संचालक मंडळाने निश्चित केले होते. ते पूर्ण करण्यात संचालक मंडळाला यश आले आहे. हा गळीत हंगाम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व सभासद, बिगर सभासद, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार व तोडणी मजूर तसेच विविध संघटना यांनी चांगले सहकार्य केले. त्याबद्दल या सर्वांचे संचालक मंडळाच्या वतीने कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी अभिनंदन केले.

  यावेळी हंगाम यशस्वी पार पाडलेबद्दल ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कारखान्याचे संचालक दिपक निंबाळकर, राजेंद्र गावडे, कार्यकारी संचालक, ए. बी. जाधव, तांत्रिक सल्लागार, एम. पी. निकम, चीफ् केमिस्ट, एस. एस. पाटील, फायनान्स मॅनेजर एच. एन. करवर, मुख्य शेतकी अधिकारी, जे. एस. शिंदे, ऊस विकास अधिकारी, पी. बी. कांबळे, सिव्हिल इंजिनिअर, टी. बी. खराडे व बहुसंख्य कर्मचारी व ऊस तोडणी वाहतूक मुकादम व तोडणी मजूर उपस्थित होते.

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने गळीत हंगामाचे केलेले योग्य नियोजन व सर्वांचे प्रयत्न व सहकार्यामुळेच ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य झाले आहे.

  – प्रशांत काटे, अध्यक्ष, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना.