
Uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. राजकारणात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अनेक नेते गाठी-भेटी घेत आहेत. अशातच शिवसेना-भाजपला पाठिंबा दिलेल्या अजित पवारांनी काही दिवसांपुर्वी शरद पवारांची भेट घेतली आणि राज्याच्या राजकारणात गाठीभेटींची जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र, या सर्व घडामोडी घडत असतानाच शिवसेना पक्षात काही गुप्त हालचाली सुरु असल्याची चर्चा सुरू आहे.
बहुतांश आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देत शिवसेनेच्या बहुतांश आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेत सहभागी झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात असलेली राजकीय समीकरणे बिघडण्यास सुरुवात झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळेच शिवसेनेतील काही नाराज आमदारांकडून उद्धव ठाकरे यांच्याशी पुन्हा संपर्क करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
उद्धव ठाकरे यांची भेट घेणार
दरम्यान, ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी (२७ जुलैला) शिंदे गटातील काही आमदार उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. या आमदारांना उद्धव ठाकरेंना भेटून शुभेच्छा द्यायच्या होत्या. त्यासाठी आमदारांकडून मातोश्रीवर फोनही करण्यात आले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या संबंधित आमदारांना भेट नाकारल्याची माहिती आहे.
शिवसेना आमदार उदय सामंत यांची प्रतिक्रिया
तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. गेली काही दिवस गैरसमजूत पसरवणारी बातमी पसरवली जात आहे. एकनाथ शिंदे याच्या वाढदिवसादिवशी मी मुख्यमंत्रीसोबत दिवसभर होतो. त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या १० आमदारांनी फोन केले. त्यातील सहा आमदार नंदनवन या बंगल्यावर भेटायलाही आले होते असं उदय सामंत म्हणाले आहेत.
शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया
आमचे आमदार भेटले नाहीत. तर याउलट त्यांच्याच आमदारांचा प्रयत्न चालू असतो. ते म्हणतात की,आमचं इथं कसं होणार? आम्हाला तुमच्यात सामावून घ्या. ठाकरे गटाचे अनेक आमदारांच्या संपर्कात आहेत. त्यांचं काय ऑपरेशन होणार आहे आता तुम्हाला लवकरच कळेल. ठाकरे गट द्विधा मनस्थितीत आहे, असं संजय शिरसाट म्हणालेत.