पिंपरी-चिंचवडमध्ये १४ लाख ७६ हजार मतदार ; सर्वाधिक मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात

जिल्हा प्रशासनाने नुकतीच प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली आहे. या यादीनुसार पुणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या ८० लाख ७३ हजार १८३ वर गेली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे.

    पिंपरी : शहरातील पिंपरीचिंचवड, भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघ आणि भोर मतदार संघातील काही भाग असे १४ लाख ७६ हजार ४१८ मतदार आहेत. जिल्ह्यात २१ विधानसभा मतदार संघ असून  सर्वाधिक मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहेत.

    जिल्हा प्रशासनाने नुकतीच प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली आहे. या यादीनुसार पुणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या ८० लाख ७३ हजार १८३ वर गेली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत प्रामुख्याने नवीन मतदारांची नाव नोंदणी, दुबार नावे कमी करणे, मयत मतदारांची नावे कमी करणे, मतदारयादीमध्ये मतदारांचे छायाचित्र समाविष्ट करणे, पत्यांमध्ये बदल, आदी कामे केली जाणार आहेत. तर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर ३० नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहे. २६ डिसेंबरला दावे व हरकती निकालात काढण्यात येणार आहेत. त्यानंतर ५ जानेवारी २०२४ ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हीच यादी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम असणार आहे.

    -भोसरीचा क्रमांक जिल्ह्यात चौथ्या स्थानावर
    पिंपरीचिंचवड शहरात तीन विधानसभा मतदार संघ येतात. यामध्ये चिंचवड विधानसभा मतदार संघ हा जिल्ह्यात सर्वाधिक संख्येचा संघ आहे. भोसरीचा क्रमांक जिल्ह्यात चौथ्या स्थानावर आहे. मार्च २०२३ मध्ये चिंचवड विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक झाली. तर गेल्या आठ महिन्यात तिन्ही विधानसभा मतदार संघात ३९ हजार ३५ मतदार वाढले आहेत.

    चिंचवड विधानसभा मतदारसंघात ५ लाख ८५ हजार ७३१ मतदार आहे. त्यात ३ लाख ११ हजार ५२८ पुरुष, २ लाख ७४ हजार १६७ महिला आणि ३६ इतर मतदार आहेत. पिंपरीत ३ लाख ६३ हजार ८२९ मतदार आहेत. त्यामध्ये १ लाख ८९ हजार ५९९ पुरुष, १ लाख ६९ हजार ५८८ महिला आणि इतर २० मतदार आहेत. तर, भोसरीत ५ लाख २६ हजार ८५८ मतदार आहेत. त्यामध्ये २ लाख ३७ हजार ३७४ पुरुष, २ लाख ८९ हजार ३९७ महिला आणि ८५ इतर मतदार आहेत. पिंपरीचिंचवड शहरात १४ लाख ७६ हजार ४१८ मतदार आहेत.