बीडमध्ये चुलत्याचा 14 वर्षांच्या पुतणीवर अत्याचार; पीडिता गर्भवती होताच प्रकार उघडकीस

बीडमध्ये चुलत्याने अत्याचार केल्यानं 14 वर्षीय अल्पवयीन पुतणी गर्भवती राहिली आणि तिने बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चुलत्याविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    बीड : बीडमध्ये चुलत्याने अत्याचार केल्यानं 14 वर्षीय अल्पवयीन पुतणी गर्भवती राहिली आणि तिने बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चुलत्याविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पीडित अल्पवयीन मुलगी इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आई-वडिलांसोबत पीडित मुलगी उस तोडणीवरून परत येत असताना तिला प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.

    याबाबत मिळालेली माहिती अशी की, बीड तालुक्यातील एका गावातील पीडितेच्या मोठ्या बहिणीचे जुलै 2023 मध्ये लग्न होते. त्यामुळे घरातील सर्व सदस्य लग्नाच्या कामात व्यस्त होते याच संधीचा गैरफायदा चुलत्याने घेतला. पीडिता ही चुलत बहिणीसोबत एका खोलीत झोपली होती. तिला धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार पीडितेने कोणालाच सांगितला नाही.

    पीडित मुलगी ही आपल्या आई-वडिलांसह ऊस तोडणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात गेली होती. सहा महिने ऊस तोडण्यात तिने मदतही केली. दोन दिवसांपूर्वी काम संपल्याने हे सर्व लोक गावी परत येत होते. कळंबजवळ येताच पीडितेला प्रसूतीवेदना सुरू झाल्या. तिला तातडीने कळंबच्या एका रूग्णालयात दाखल केले.

    तेथे सोनोग्राफी करून लगेच तिची प्रसुती करण्यात आली. तिने एका मुलीलाही जन्म दिला. त्यानंतर याप्रकरणाला वाचा फुटली. नराधम चुलत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.