१५ एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान; शॉर्टसर्किटने लागली आग

शिरोळ (Shirol) तालुक्यातील हेरवाड (Herwad) येथे जमादार मळा, धनगर पट्टी, घोलप मळा या ठिकाणी असलेल्या १५ एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

    कुरुंदवाड : शिरोळ (Shirol) तालुक्यातील हेरवाड (Herwad) येथे जमादार मळा, धनगर पट्टी, घोलप मळा या ठिकाणी असलेल्या १५ एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतातील ठिबक सिंचन, मोटर पेटी, केबल वायरिंग यासह उसाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान ही आग शॉर्टसर्किटने लागली असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

    याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, हेरवाड हद्दीतील जमादार मळा, धनगर पट्टी, घोलप मळा या ठिकाणी सागर राणोजी इटाज, राहुल सिद्राम इटाज, सदाशिव, कल्लाप्पा कोरुचे, माणिक कल्लाप्पा कोरूचे, मुताप्पा सत्यप्पा कोरूचे, रशीद बाऊरुद्दिन जमादार, शिवाजी घोलप व अन्य शेतकऱ्यांच्या पंधरा एकर क्षेत्रातील ऊसाला अचानक आग लागली. घोलप मळा इथून उसाने पेट घेतला यानंतर जमादार मळा धनगर पट्टी या ठिकाणातील उसाचे क्षेत्र जळून खाक झाले.

    ऊस क्षेत्रात अनेक शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन मोटर पेटी, केबल वायरिंग जळाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे. त्यामुळे तातडीने या घटनेचा पंचनामा करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.