पुण्यातील सायकलस्वारांनी आठवड्यात गाठले अयोध्या; दोन महिलांचा समावेश, वाचा सविस्तर

पुण्यातील वाघोली येथील सह्याद्री सायकल रायडर्सच्या 15 सायकलस्वारांनी एका आठवड्याध्ये पुणे ते अयोध्या अंतर पार केले आहे.

    अयोध्या : पुण्यातील वाघोली (Wagholi) येथील सह्याद्री सायकल रायडर्सच्या (Sahyadri Cycle Riders) 15 सायकलस्वारांनी एका आठवड्याध्ये पुणे ते अयोध्या (Ayodhya) अंतर पार केले आहे. यामध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे. तब्बल 1600 किलोमीटरचा प्रवास सायकलने करत त्यांनी प्रभू श्री रामांचे (Ram Mandir) दर्शन घेतले आहे. या सायकलस्वारांनी घेतलेल्या मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    सह्याद्री सायकल रायडर्सच्या या 15 रायडर्सने 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर पुण्यातून प्रस्थान केले. दररोज 200 किलोमीटरचे अंतर वाऱ्यासारखे पार करत या सायकलस्वारांनी आठवड्यात अयोध्यानगरी गाठली. तीन फेब्रुवारीला ते अयोध्येत सायंकाळी चार वाजता पोहचले. सात वाजता त्यांनी श्री राम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. भर थंडीत निसर्गाचा आनंद लुटत या रायडर्सनी हे अंतर पार केले. रविवारी दुपारी ते परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.

    या उत्साहवर्धक प्रवासामध्ये सह्याद्री सायकल रायडरचे अध्यक्ष गिरीष कुलकर्णी व कॅप्टन चेतन कोठावडे यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र भिडे, संदीप डफळ, योगेश सातव, युवराज दळवी, सुनील बलकवडे, ऋषिकेश पाटील, तेजस पाठक, पंकज पाटील, सुचिता पंचवटीकर, पुनम रंधवे, आश्विन जोगदेव, नंदकुमार तांबे, स्नेहल सिंगारे, निलेश कुलकर्णी हे सायकल रायडर्स सहभागी झाले होते.