15 दिवस डेंग्यूमुळे आजारी, राजकीय आजार स्वभावात नाही’ ; अजित पवारांचं विरोधकांना प्रत्युत्तर

मी लेचापेचा माणूस नाही. मागील १५ दिवस डेंग्यूमुळे आजारी होतो. मी माझी मतं गेली ३२ वर्षे स्पष्टपणे मांडत असून, राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी मांडली.

    पुणे : मी लेचापेचा माणूस नाही. मागील १५ दिवस डेंग्यूमुळे आजारी होतो. मी माझी मतं गेली ३२ वर्षे स्पष्टपणे मांडत असून, राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी मांडली.

    पुणे दौऱ्यावर असलेल्या पवार यांनी सारथी, फाैजदारी न्यायालय आदी शासकीय इमारतींच्या कामाची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. विरोधकांकडून अजित पवार यांना राजकीय आजार झाल्याची टीका करण्यात येत आहे. या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्‍नावर पवार यांनी परखड शब्दात भूमिका मांडली.

    ते म्हणाले ‘‘ दिवाळीपूर्वी डेंग्यूमुळे १५ दिवस वाया गेले. राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही. मी माझी मतं गेल ३२ वर्षे स्पष्टपणे मांडत आलो आहे. मध्यंतरी अमित शहांना भेटलो. तक्रार करण्यासाठी अमित शहांना भेटल्याची माहिती खोटी आहे. तक्रार करणे माझ्या स्वभावात नाही.’’ अस पवार म्हणाले.

    भडकाऊ भाषण करू नये

    जालन्यातील अंतरवली सराटीत दगडफेक केलेल्या मुख्य आरोपीवर करण्यात आलेल्या कारवाईवर आपली प्रतिक्रिया दिली. यासंदर्भात बोलताना, अंतरवली सराटीतील अटकेबाबत मला माहिती नाही. त्याबाबत माहिती घेतो. आरक्षणाबाबतीत काम सुरू आहे. कोणीही भडकाऊ भाषण करू नये, सुसंस्कृत महाराष्ट्र कसा आहे हे यशवंतराव चव्हाण यांनी दाखवले आहे. सत्ताधारी असो विरोधक असो कोणीही असो त्यांनी भडकाऊ भाषण करू नये. वाचाळवीरांनी समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हणाले.