Indian Doctors Olympics
Indian Doctors Olympics

  पुणे : यंग डॉक्टर्सं लीग (वायडीएल) आयोजित देशातील पहिल्या ‘इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’ राष्ट्रीय स्पर्धेत दीड हजारहून अधिक डॉक्टर-क्रिडापटूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. सांघिक आणि वैयक्तिक अशा एकूण ११ क्रीडाप्रकारांचा समावेश असलेली ही स्पर्धा पुण्यामध्ये ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीमध्ये होणार आहे.

  इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक

  ‘इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’ (आयडीएल) समितीचे अध्यक्ष डॉ. नचिकेत महींद्रकर आणि सचिव डॉ. अमित द्रविड यांनी सांगितले की, या ऑलिंपिक स्पर्धेत क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि थ्रो-बॉल हे सांघिक (टिम) खेळ तसेच बॅडमिंटन, टेनिस, अ‍ॅथलेटिक्स्, कॅरम, बुद्धीबळ, टेबल-टेनिस, लॉन-टेनिस असे वैयक्तिक क्रीडाप्रकार खेळविण्यात येणार आहेत. ‘इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’ स्पर्धेचे सामने श्री शिवछत्रपती क्रीडा संकूल-बालेवाडी, पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना क्लब, व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी-सिंहगड रोड, स्केलअप अ‍ॅकॅडमी मैदान-वारजे, डीएसके स्टार क्रिकेट अ‍ॅकॅडमी-धायरी आणि शिंदे हायस्कूल-सहकारनगर अशा विविध मैदानांवर होणार आहेत.

  पुणे जिल्हा फुटबॉल संघटना

  या स्पर्धेचे उद्धघाटन खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून आमदार आणि पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ. विश्‍वजीत कदम, बॅडमिंटनपटू आणि ऑलिंपिक खेळाडू निखील कानेटकर, राष्ट्रीय टेनिसपटून संदीप किर्तने आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे डॉ. भुषण माणगांवकर आणि पराग देशमुख आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा उद्धघाटन सोहळा शुक्रवार, १ डिसेंबर रोजी, श्री शिवछत्रपती क्रीडा संकूल-बालेवाडी येथे सकाळी ११ वाजता होणार आहे.

  या सांघिक खेळामध्ये पुरूषांचे ४० संघ सहभागी

  संयोजन समितीचे डॉ. नितीन गडकरी आणि डॉ. संदीप पाटील यांनी सांगितले की, सांघिक आणि वैयक्तिक क्रीडाप्रकारांमध्ये मिळून देशातील दीड हजाराहून अधिक डॉक्टर्स सहभागी झाले आहेत. यामध्ये मुख्यतः एमबीबीएस डॉक्टर्स असून बीएएमएस, बीयुएमएस आणि बीडीएस डॉक्टरांचाही सहभाग आहे. सुमारे १२०० पुरूष आणि ३०० महिला डॉक्टर्स अशी त्याची वर्गवारी आहे. क्रिकेट या सांघिक खेळामध्ये पुरूषांचे ४० संघ सहभागी झाले आहेत. फुटबॉल क्रिडाप्रकारामध्ये पुणे, मुंबई आणि कर्नाटक येथून १० संघ सहभागी झाले आहेत. व्हॉलीबॉलमध्ये पुणे, अहमदनगर, मराठवाडा, कोल्हापूर येथून एकूण १० संघ सहभागी झाले आहेत. महिलांच्या थ्रो बॉलमध्ये पुण्यातील ५ संघ सहभागी झाले आहेत.

  वैयक्तिक क्रीडाप्रकारांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगढ, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, पश्‍चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, पंजाब, हरयाणा, तेलंगणा या राज्यातून सुमारे ९०० डॉक्टरांनी सहभाग नोंदविला आहे.