१९ कोटींचा GST भरण्यासाठी लाखोंची मदत; पंकजा मुंडेंच्या मदतीला कार्यकर्ते धावले

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर कारवाई करण्यात आली. जीएसटी थकवल्यामुळे केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाकडून कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. या कारवाईमुळे पंकजा मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत.

  बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर कारवाई करण्यात आली. जीएसटी थकवल्यामुळे केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाकडून कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. या कारवाईमुळे पंकजा मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी पंकजा मुंडे यांना जीएसटीचे पैसे भरण्यासाठी मदत म्हणून लाखो रुपयांची मदत देण्याची मोहिम सुरू केली आहे.

  अगदी एक लाख रुपयांपासून ५० लाख रुपयांपर्यंत मदतीचे धनादेश गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या नावाने लिहून तयार आहेत. हे चेक दसरा मेळावा दिवशी देणार असल्याचे पंकजा मुंडे समर्थकांनी सांगितले.

  फक्त १९ कोटींसाठी आमचे दैवत मुंडे साहेबांचा आत्मा वैद्यनाथ कारखाना बदनाम करत असाल, तर आम्ही मुंडे भक्त लोकवर्गणीतून ती रक्कम तुमच्या थोबाडावर फेकून मारू, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.

  एकीकडे राज्यातील विविध कारखान्यांना केंद्रीय सहकार विभागाने मदत केली असताना दुसरीकडे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना मात्र मदतीच्या यादीतून टाळलं आहे. याच मुद्द्यावर मुंडे समर्थकांनी सोशल मीडियातून चीड आणि संताप व्यक्त केलाय. त्यामुळे सध्या मुंडे समर्थकांचा रोष राज्यातील भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर आहे.

  विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या पोस्ट मधून आम्ही ऊसतोड मजुरांनी भगवानगड उभा केलाय, भगवान भक्तिगड, गहिनीनाथ गड उभा केलाय आणि गोपीनाथगड सुद्धा उभा केलाय. आमच्या दैवतांसाठी आम्ही प्रत्येक गावात कोटी दोन कोटी सहज दान देतो. तुमचा माज जिरवण्यासाठी आम्हाला दोन दिवससुद्धा लागणार नाहीत, तुम्ही सगळ्यांना गृहीत धरून येड्यात काढू शकता, पण आमच्या नादी लागाल, तर तुम्ही परत दुर्बीण लावूनसुद्धा दिसणार नाहीत, असा इशारा देखील पंकजा मुंडे समर्थकांनी दिला आहे.

  जीएसटी विभागाकडून कारवाईची नोटीस

  परळीतला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा पंकजा मुंडे यांच्या ताब्यात आहे. कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने 6 महिन्यांपूर्वी छापेमारी करून काही कागदपत्रे तपासले होते. या तपासणीमध्ये कारखान्याने 19 कोटी रुपयांचा जीएसटी बुडवल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर 24 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटी आयुक्तालयाने या कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईनंतर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देतांना पंकजा मुंडे यांना शक्य तेवढी मदत करणार असल्याचं म्हटले.