कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने 19 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

आयटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला.

    पुणे : आयटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला. याबाबत सुभाषचंद्र श्रीमुनीलाल शर्मा (वय ४४, रा. ग्वालियर लाइन, वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, विनोदकुमार शर्मा (रा. बुलंद, उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

    पोलिसांच्या माहितीनुसार, शर्मा यांचा मुलगा उमेश याला आयटी कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता. विनोदकुमार यांनी त्यांना प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविले. शर्मा यांना एका इमेलवर मुलाची माहिती पाठविण्यास सांगितले. इमेल केल्यानंतर त्यांना मुलाला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर शर्मा यांना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले.

    शर्मा यांनी बँक खात्यात वेळोवेळी १९ लाख ९ हजार रुपये जमा केले. त्यानंतरही प्रवेश मिळवून दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे तपास करत आहेत.