भगरीच्या प्रसादामुळे तब्बल 192 भाविकांना विषबाधा; चक्क झाडाला दोरी बांधून रुग्णांना सलाईन

अखंड हरिनाम सप्ताहामध्ये भगरीच्या प्रसादामुळे तब्बल 192 भाविकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. रुग्णालयामध्ये जागा कमी पडू लागल्यामुळे बाहेरच्या आवारामध्ये ताडपत्री टाकून व झाडांना दोरी बांधून त्यावर सलाईन लटकवून रुग्णांना देण्यात आले.

    बुलढाणा : मंदिरातील प्रसादामुळे आसपासच्या परिसरातील तब्बल 192 भाविकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये भगरीचा प्रसाद वाटप करण्यात आला. यानंतर भाविकांना रात्रीच्या सुमारास त्रास सुरु झाला. रुग्णांना नजिकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र जागा कमी पडू लागल्यामुळे बाहेरच्या आवारामध्ये ताडपत्री टाकून व झाडांना दोरी बांधून त्यावर सलाईन लटकवून रुग्णांना देण्यात आले. यामुळे शासकीय यंत्रणांची रात्री उशिरा एकच तारांबळ उडाली.

    लोणार तालुक्यातील खापरखेड व सोमठाणा या गावांच्या मधोमध असलेल्या भगवान काळू नाडे यांच्या शेतात विठ्ठल रुखमाई यांचे मंदिर आहे. त्या ठिकाणी 14 फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता. 20 फेब्रुवारीला 7 व्या दिवशी एकादशी आल्याने भाविकांसाठी भगरीचा प्रसाद तयार करण्यात आला. दरम्यान, प्रसाद खाल्ल्यानंतर दोन्ही गावातील भाविक रात्री उशिरा घरी परतले. मात्र काही वेळाने गावकऱ्यांना अचानक मळमळ, उलटी, चक्कर, जुलाब याचा त्रास सुरू झाला. रुग्णांना बिबी (ता. लोणार) येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    मात्र रात्रीच्या वेळी शासकीय रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच गेली. त्यातच वैद्यकीय अधीक्षक रुग्णालयात हजर नसल्याने मदतीसाठी खासगी डॉक्टरांना बोलावण्यात आले. रुग्णांची संख्या अधिक असल्याने व जागा अपुरी पडल्याने दवाखान्याच्या प्रांगणात ताडपत्री टाकून व झाडाला दोरी बांधून रुग्णांना सलाईन देण्यात आले. काही रुग्णांना लोणार येथील शासकीय रुग्णालयात तर काहींना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.