
शिवाजी विद्यापिठात ४ जून ला आयोजन, कवी विठ्ठल वाघ असणार अध्यक्षस्थानी
सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पहिले नांगरट साहित्य संमेलन रविवार दि. ४ जून रोजी शिवाजी विद्यापीठातील वि. स. खांडेकर भाषा भवन सभागृहात होणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणाऱ्या या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कविवर्य डॉ. विठ्ठल वाघ, उद्घाटक वात्रटिकाकार रामदास फुटाणे असणार आहेत. सदर संमेलनामध्ये ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे, ज्येष्ठ शेतकरी नेते वामनराव चटप यांना स्वाभिमानी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी प्रश्नांचे कला साहित्य माध्यमे व राजकारण यात उमटलेले प्रतिबिंब या विषयावर परिसंवाद ही होणार आहे. या परिसंवादात माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख, लेखक दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे, ज्येष्ठ साहित्यिक विजय चोरमारे, ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील, ज्येष्ठ लेखक विचारवंत, प्राध्यापक, डॉ. जालिंदर पाटील सहभागी होणार आहेत. याचबरोबर निमंत्रितांचं कवी संमेलन ही होणार असून या संमेलनाचे सुरेश शिंदे हे अध्यक्ष असणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे . यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.