ऑनलाईन खरेदी करताय? तर थोडी काळजी घ्याच ! सायबर गुन्हेगाराने शिक्षिकेला घातलाय 2.97 लाखांचा गंडा

सायबर गुन्हेगाराने एका शिक्षिकेची 2 लाख 97 हजार रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिसांनी शीतल ओबेरॉय (वय 47, रा. कडबी चौक) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

    नागपूर : सायबर गुन्हेगाराने एका शिक्षिकेची 2 लाख 97 हजार रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिसांनी शीतल ओबेरॉय (वय 47, रा. कडबी चौक) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

    शीतल एका शाळेत शिक्षिका आहेत. त्यांना प्लॅस्टिक डबे खरेदी करायचे होते. सोशल मीडियावर सर्च करत असताना त्यांनी एका अॅपवरून 999 रुपये किंमतीचे 6 प्लॅस्टिक डबे ऑर्डर केले. ऑर्डरनुसार प्लॅस्टिक डबे त्यांच्या पत्यावर आले. मात्र, डबे व्यवस्थित नसल्याने त्यांनी परत करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रक्रिया सुरू केली. आरोपीने त्यांना कस्टमर सपोर्ट अॅप डाउनलोड करण्यास सांगितले.

    अॅप डाउनलोड केल्यानंतर प्लॅस्टिक डबे परत घेण्याचे तसेच संपूर्ण रक्कम परत करण्याची हमी दिली. त्यामुळे फिर्यादीने अॅप डाउनलोड केला असता यूपीआय कनेक्ट झाला व त्यांच्या बँकेची माहिती आरोपीला मिळाली. आरोपीने साउथ इंडीयन बँक तसेच इंड् स बँकेच्या खात्यातून 2 लाख 97 हजार रुपयांची रक्कम वळती करून फिर्यादीची फसवणूक केली.