अल्पवयीन वाहन चोरट्यांसह दोघे जाळ्यात, 8 दुचाकी जप्त; कोंढवा पोलिसांची कारवाई

कोंढवा पोलिसांनी पेट्रोलिंगदरम्यान केवळ संशयावरून पकडलेल्या तरुणाकडून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणत त्याला व त्याच्या अल्पवयीन साथीदाराला जेरबंद केले.

    पुणे : कोंढवा पोलिसांनी पेट्रोलिंगदरम्यान केवळ संशयावरून पकडलेल्या तरुणाकडून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणत त्याला व त्याच्या अल्पवयीन साथीदाराला जेरबंद केले. वाहन चोरीचे 8 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. त्यांनी विविध भागातून वाहने चोरल्याचे समोर आले आहे.

    सोहेल मन्सुर पोटोदे (वय 19, रा. थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त आर. राजा, वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील, पोलीस अंमलदार विशाल मेमाणे, निलेश देसाई यांच्या पथकाने केली.

    सोहेल हा गॅरेजमध्ये नोकरी करतो. तो मुळचा थेरगाव परिसरातील राहणारा आहे. तर, त्याचा अल्पवयीन साथीदार कोंढवा येथील आहे. त्या दोघांनी वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरल्या असल्याचे समोर आले आहे.

    दरम्यान, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ संतोष पाटील यांनी वाहन चोरी तसेच घरफोडीच्या अनुषंगाने परिसरात पेट्रोलिंग व गस्त घालण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्यानूसार, तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक दिनेश पाटील आणि त्यांचे पथक हे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. तेव्हा पोलीस अंमलदार सागर भोसले आणि संतोष बनसुडे यांना पिसोळी येथील आंबेकर हॉटेल चौकात त्यांना एक व्यक्ती निळया रंगाच्या यामाहा दुचाकीवर बसलेला दिसला. त्या यामाहावरील नंबर खोडलेला असल्याचे लक्षात आल्याने त्याच्याकडे चौकशी करण्यास सुरूवात केली. त्याने उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली.

    पोलिसांनी त्याला यामाहा गाडीसह पकडले व पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याकडे सखोल तपास सुरू केला असता त्याने एका अल्पवयीन साथीदारासह मिळुन 6 वाहने चोरल्याची कबुली केली. पोलिसांनी त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता आणखी दोन गुन्हे उघडकीस आणले आहे. एकूण त्यांच्याकडून 8 गुन्हे उघडकीस आणत दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.