dahanu accident

डहाणू बोर्डी रोडवर (Dahanu Bordi Road Accident) पारनाका येथे उपवन संरक्षक कार्यालयासमोर कार अपघात झाला आहे. या अपघातामध्ये डहाणू नगर परिषदेच्या दोन स्वच्छता कामगारांचा (2 Dead In Dahanu Accident) जागीच मृत्यू झाला.

    डहाणू : आज सकाळी साडेआठच्या सुमारास डहाणू बोर्डी रोडवर (Dahanu Bordi Road Accident) पारनाका येथे उपवन संरक्षक कार्यालयासमोर कार अपघात झाला आहे. या अपघातामध्ये डहाणू नगर परिषदेच्या दोन स्वच्छता कामगारांचा (2 Dead In Dahanu Accident) जागीच मृत्यू झाला. सोळा वर्षीय मुलाचा भरधाव कारवरील ताबा सुटल्याने रस्त्यालगत उभ्या असलेल्या दोन स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडून कार समोरच्या भिंतीवर आदळली. डहाणू पोलीस या अपघाताबाबत अधिक तपास करीत आहेत.

    शनिवारी सकाळी डहाणू नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी भरत राऊत (वय – ५५ रा. आगर, कॉटेज हॉस्पिटलनजीक) आणि वंकेश झोप (वय, ३८ रा. चिंबावे बामणपाडा) हे डहाणू बोर्डी प्रमुख राज्य मार्गावर रस्त्याच्या पूर्वीकडे पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी गटार स्वच्छतेचे काम करत होते. पाऊस आल्याने लगतच्या भिंतीचा आडोसा घेऊन ते उभे होते. त्याचवेळी नरपडहून पारनाकाकडे जाणाऱ्या पांढऱ्या रंगांची भरधाव कार चालकाचा ताबा सुटल्याने दोन्ही स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडून भिंतीवर जाऊन आदळली. या अपघातात दोन्ही स्वच्छता कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर १६ वर्षीय कारचालक (रा.डहाणू, इराणी रोड) सुस्थितीत आहे.

    प्रत्यक्षदर्शींनी डहाणू पोलिसांना माहिती दिल्यानंतर दोघांचे मृतदेह आगर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तर आरोपी डहाणू पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी दिली. दरम्यान पोलीस स्टेशनच्या आवारात स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आणि जिल्हा रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती.