कराड परिसरात ‘एलसीबी’ची मोठी कारवाई; दोन अटकेत

सातारा जिल्हा आणि लगतच्या सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव तालुका हद्दीतून सहा महिनाभरासाठी तडीपार करण्यात आलेल्या दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने कराड एसटी स्टँड परिसरातून अटक केली.

    सातारा : सातारा जिल्हा आणि लगतच्या सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव तालुका हद्दीतून सहा महिनाभरासाठी तडीपार करण्यात आलेल्या दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने कराड एसटी स्टँड परिसरातून अटक केली. प्रतिक विजय साठे (वय 28, रा. बुधवार पेठ, कराड) व बजरंग उर्फ बजा सुरेश माने, (वय 27, रा.बुधवार पेठ, कराड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना कराड शहर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.

    पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सातारा जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्याचे कडक धोरण ठेवले आहे. शांतता व सुव्यवस्था भंग करणाऱ्या गुन्हेगारांना तडीपार करण्यात येत आहे. अशा गुन्हेगारांची माहिती प्राप्त करून त्यांना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना प्राप्त होत्या. 10 जून रोजी धुमाळ यांना आपल्या गोपनीय बातमीदारामार्फत सातारा जिल्हा व सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आलेला साठे व माने हा गुन्हेगार एसटी स्टँड परिसरात फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यांनी आपल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पाचारण करून पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने एसटी स्टँड परिसरात सापळा लावून प्रतीक साठे व बजा माने या दोघांनाही तातडीने ताब्यात घेतले.

    दरम्यान, या कारवाईत पोलिस हवालदार साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, अमोल माने, मयूर देशमुख, मोहसीन मोमिन, प्रवीण पवार, केतन शिंदे, गणेश कचरे यांनी कारवाईत भाग घेतला.