चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोर्टाने चांगलाच शिकवला धडा; 20 वर्षे कारावासाची शिक्षा

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या एका नराधमास पोक्सोच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए.जी. राऊत यांनी दोषी ठरवून 20 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. योगेश शंकर वानखेडे (वय 38, रा. संजयनगर, पांढराबोडी) असे दोषीचे नाव आहे.

    नागपूर : चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या एका नराधमास पोक्सोच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए.जी. राऊत यांनी दोषी ठरवून 20 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. योगेश शंकर वानखेडे (वय 38, रा. संजयनगर, पांढराबोडी) असे दोषीचे नाव आहे. वाडी पोलिसांनी 4 वर्षीय पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून योगेशविरुद्ध गुन्हा नोंदविला होता.

    पीडित मुलीच्या कुटुंबाने योगेशला घरी फर्निचरचे काम करण्यासाठी बोलावले होते. 2 फेब्रुवारी 2023 च्या दुपारी 2 वाजताच्या सुमारास मुलगी घरी पहिल्या माळ्यावर खेळत होती. तिला एकटे पाहून योगेशच्या अंगात शैतान संचारला. त्याने मुलीवर अत्याचार केला. पीडित मुलगी रडत आईकडे गेली आणि योगेशच्या कृत्याची माहिती दिली. योगेश घटनास्थळावरून फरार झाला. वाडी पोलिसांनी पोक्सो अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला.

    जवळपास एक महिन्यानंतर पोलिसांना त्याला अटक करण्यात यश आले. पोलिस उपनिरीक्षक विद्या काळे यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकारी वकील शहाजहा शेख आरोप सिद्ध करण्यात यशस्वी झाले. न्यायालयाने योगेशला दोषी ठरवून 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी पोहवा अनिल पोतराजे यांनी अभियोजन पक्षाला सहकार्य केले.