khoni grampanchayat

खोणी गावात तब्बल 200 बेकायदा वीज जोडण्या खंडीत करण्याची कारवाई वीज वितरण कंपनीने केली आहे. विशेष म्हणजे खोणी ग्रामपंचायत देखील वीज चोरी करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

    कल्याण ग्रामीण: कल्याण (Kalyan) नजीक असलेल्या खोणी गावात (Khoni Village) वीज चोरी (Electricity Theft) करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर काल प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. आज याच गावात वीज चोरी करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रचंड पोलिस बंदोबस्तासह वीज वितरण कंपनीचे पथक पोहचले. तब्बल 200 बेकायदा वीज जोडण्या खंडीत करण्याची कारवाई वीज वितरण कंपनीने केली आहे. विशेष म्हणजे खोणी ग्रामपंचायत देखील वीज चोरी करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सगळ्यात श्रीमंत ग्रामपंचायत अशी ख्याती असलेल्या खोणी ग्रामपंचायतीनेही देखील वीज चोरी केली आहे. ग्रामपंचायतीचाही वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

    काल वीज वितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आज वीजचोरांवर कारवाई
    बुधवारी खोणी गावातील वीज चोरीच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या पथकासह पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. लाकडी दांडक्याने मारुन पथकासह पोलिसांना पिटाळून लावण्याचा प्रकार घडला होता. या मारहाण आणि दगडफेकीत पथकाच्या गाडीच्या काचा फुटल्या होत्या. पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर वीज वितरण कंपनीने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच हल्ला करणाऱ्या जमावाच्या विरोधात तक्रार दिली होती. पोलिसांनी या प्रकरणी दाखल केला हाेता.

    खोणी ग्रामपंचायतीचा वीज पुरवठा खंडित
    आज वीज वितरण कंपनीचे अधिकारी नरेंद्र धवड, सुमीत कुमार, डी. आर. पाटील आणि जनसंपर्क अधिकारी विजय दूधभाते यांच्यासह मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे आणि पोलीस अधिकारी बाळासाहेब पवार यांच्यासह 50 पोलिसांचा ताफा घेऊन खोणी गावात कारवाईकरीता पोहचले. पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरु केली. जवळपास 200 वीज बेकायदा वीज जोडण्या खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे चोरीची वीज खोणी ग्रामपंचायतदेखील वापरत असल्याने या ग्रामपंचायतीचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. या वीज चोरांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात वीज वितरण कंपनीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकारी वर्गाने सांगितले.