अबब… पुण्यात 21 हजार गुन्हेगार; पोलीस करणार प्रत्येकाला चेक!

शांतताप्रिय पुण्यात गेल्या काही ‌वर्षांमध्ये अचानक वाढलेल्या हाणामारीच्या घटना व लुटमारीच्या घटनांनी पुणेकर हैराण आहेत. रात्री तर सोडाच पण, दिवसा देखील एकट्या नागरिकांना फिरणे जिकीरीचे झाले आहे. त्यात गेल्या काही दिवसात कोयतेधारी टोळक्याने चांगलाच उच्छाद घातला आहे. तर, लुटमार तसेच हाणामाऱ्या व दहशत माजविणाऱ्या टवाळखोरांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे.

  पुणे – (अक्षय फाटक) शांतताप्रिय पुण्याची ओळख वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनी पुरती पुसली गेली आहे. शांततेची लक्तरे नव्याने भाई आणि दादा तसेच शरिराविरूद्धचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांनी वेशीवर टांगली असून, पोलिसांच्या देखील नाकीनऊ आणल्याचे वास्तव आहे. याच गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी आता पुणे पोलिसांनी अशा तब्बल 21 हजार गुन्हेगारांची यादीच तयार केली आहे. या १२ हजार गुन्हेगारांची इंतभूत माहिती पुणे पोलिसांकडून संकतिलकरून त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून “गुन्हेगारी”वर पोलिसांचा वचक बसविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या बेसिक पोलिसींगच्या प्रयोगातून या गुन्हेगारांवर वचक ठेवून शहरात वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

  पुण्याच्या विस्तार वाढत असताना शहरातील गुन्हेगारी देखील तितक्याच पट्टीने वाढत असल्याचे दिसत आहे. पोलीस दप्तरी दरवर्षी जवळपास १३ हजारांहून अधिक गुन्ह्यांची नोंद होत आहे. गेल्या वर्षी (२०२२) शहरात साडे दहा हजार (भाग १ ते ५) गुन्हे दाखल झाले आहेत. तर, अमली पदार्थ, जुगार, दारू बंदी व इतर गुन्ह्यांचा विचार केल्यास ती संख्या १३ हजार ६८१ इतकी आहे. हे पोलिसांकडे दाखल झालेल्या गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांपर्यंत न पोहचलेल्या तक्रारींची संख्या वेगळीच म्हणावी लागेल.

  शांतताप्रिय पुण्यात गेल्या काही ‌वर्षांमध्ये अचानक वाढलेल्या हाणामारीच्या घटना व लुटमारीच्या घटनांनी पुणेकर हैराण आहेत. रात्री तर सोडाच पण, दिवसा देखील एकट्या नागरिकांना फिरणे जिकीरीचे झाले आहे. त्यात गेल्या काही दिवसात कोयतेधारी टोळक्याने चांगलाच उच्छाद घातला आहे. तर, लुटमार तसेच हाणामाऱ्या व दहशत माजविणाऱ्या टवाळखोरांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे.

  पुणे पोलिसांनी आता शरिराविरूद्धचे गुन्हे करणाऱ्या अशा गुन्ह्यांवर वचक बसविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या ७ वर्षांतील रेकॉर्डवर असणाऱ्या गुन्हेगारांच्या नावांची यादी तयार केली आहे. या ७ वर्षात शहरात तब्बल ११ हजार ९८६ गुन्हेगार सापडले आहेत. ज्यांचे रेकॉर्ड पोलिस दप्तरी असून, हे सर्व शरिराविरूद्ध गुन्हे करणारे गुन्हेगार आहेत. यामुळे या गुन्हेगांरावर यापुढे विशेष नजर ठेवली जाणार आहे.

  असे होणार चेक अन् असे ठेवणार लक्ष..!
  शहरातील गेल्या ७ वर्षात रेकॉर्डवरील हे गुन्हेगार आहेत. पोलीस ठाण्यानुसार त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. ती यादी संबंधित पोलीस ठाण्यांना दिली जाणार आहे. त्यानूसार पोलीस ठाणे व गुन्हे शाखेकडून या गुन्हेगारांवर लक्ष ठेवले जाणार आहे. ते गुन्हेगार सध्या कुठे राहतात, काय करतात, कोणत्या टोळीशी संपर्कात आहेत का, काम कुठे करतात त्यांचे मित्र आणि कौटुंबिक माहिती गोळा केली जाणार आहे. तसेच, त्यांना पोलीस ठाण्यात बोलवून देखील हजेरी घेतली जाणार आहे. त्यांचे चेकींग झाल्यानंतर गुन्हे शाखा त्यांच्या हालचालींवर नजर ठेवून असणार आहेत.

  शहरातील झोननुसार शरिराविरूद्धचे गुन्हेगार
  झोन १. १ हजार ३०४
  झोन २- १ हजार ५६९
  झोन ३- २ हजार १८९
  झोन ४- ३ हजार ०७१
  झोन ५- ३ हजार ८५३
  एकूण- ११ हजार ९८६

  गुन्हेगारीत अन् गुन्ह्यात झोन ४ व ५ ची आगेकुच कायम..!
  शहरातील सर्वाधिक गुन्हे असणाऱ्या झोन चार व पाचची आगेकुच यंदा देखील कायम आहे. सर्वाधिक गुन्हे असणारा झोन ५ आणि त्याखाली ४ आहे. गुन्हेगारीच्या नव्या यादीनुसार सर्वाधिक गुन्हेगार देखील याच दोन झोनमध्ये आहे. कोयतेधारी व दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांची लक्षणीय संख्या या परिसरात आहे. शहरातील उपनगरांचा भाग या झोनमध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे या भागातील गुन्हेगारीत मोठी वाढ होत असल्याचे निरीक्षण आहे.

  ११ हजार शरिराविरूद्धचे गुन्हेगार…
  शहरातील गेल्या सात वर्षांमधील हे २१ हजारांच्या जवळपास गुन्हेगार आहेत. त्यातील पहिल्या टप्यात ११ हजार ९८६ गुन्हेगारांची यादी तयारकरून संबंधित पोलीस ठाण्यांना पाठविण्यात आली आहे. त्यानूसार त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यानंतर पुढच्या टप्यात घरफोड्या, चैन स्नॅचिंग तसेच इतर गुन्ह्यातील जवळपास १० हजार गुन्हेगारांची यादी तयार केली जाणार असून, त्या गुन्हेगारांवरही याच पद्धतीने लक्ष ठेवले जाणार आहे. शरिराविरूध्दच्या या गुन्हेगारांवर मोक्का, एमपीडीए, तडीपारी सारखी कारवाई केली जाणार आहे. त्यामध्ये सातत्याने गुन्हेगारांचा समावेश असून, इतर गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.