दगडूशेठ हलवाई मंदिराचा पेशवाई थाट, गणेशजन्म सोहळ्यासाठी ‘इतक्या’ तोळ्यांचा सोन्याचा पाळणा

यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश जन्म सोहळा दुपारी 12 वाजता शेकडो गणेशभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला

    माघ महिन्यात चतुर्थीला अनेक ठिकाणी गणेशजन्माचा कार्यक्रम आयोजित केला जातो. पुण्यातील (Pune) दगडुशेठ हलवाई गणपती (Dagdusheth Halwai Temple) मंदिरातदेखील गणेशजन्माच्या (Ganeshjanma) सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. अतिशय मंगल स्वरांत पाळणा म्हणत पारंपरिक वेशातील महिलांनी गणरायाची मनोभावे प्रार्थना केली. स्वस्तिक, ओम यांसारखी शुभचिन्हे आणि गजमुखाच्या नक्षींनी सजलेल्या सोन्याच्या पाळण्यात गणपती बाप्पाच्या जन्माचा सोहळा रंगला होता. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण गणेश जन्मासाठी वापरण्यात आलेला हा पाळणा चक्क 228 तोळ्यांचा होता.

    यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश जन्म सोहळा दुपारी 12 वाजता शेकडो गणेशभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता.

    या सोहळ्यामध्ये डॉ. कृतार्थ क्षीरसागर, डॉ. रिद्धी क्षीरसागर, केदार गोडसे, प्राजक्ता गोडसे यांच्या हस्ते गणेशजन्माचे पूजन करण्यात आले.मंदिरावर केलेली तिरंगी फुलांची आरास व विद्युतरोषणाई अशा मनोहारी सजावटीने मंदिर परिसर अधिकच सुंदर दिसत होता.परदेशी महिलांनी देखील बाप्पाच्या दर्शनासाठी दगडूशेठ मंदिरात हजेरी लावली आहे.जन्मोत्सवावेळी अनेक महिलांनी गर्दी केली होती.