दिवाळीत लालपरी झाली ‘मालामाल’; महामंडळाच्या खात्यात तब्बल 23 कोटींचे उत्पन्न

दिवाळीत गावी जाऊन सण साजरा करण्याची हौस वेगळीच असते. त्यामुळे दिवाळीच्या काळात गावी जाण्यासाठी प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या वाहनाचा वापर करून जाण्यासाठी प्राधान्य देतात. पुण्यात राज्य आणि राज्याबाहेरील राहणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे.

    पुणे : दिवाळीत गावी जाऊन सण साजरा करण्याची हौस वेगळीच असते. त्यामुळे दिवाळीच्या काळात गावी जाण्यासाठी प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या वाहनाचा वापर करून जाण्यासाठी प्राधान्य देतात. पुण्यात राज्य आणि राज्याबाहेरील राहणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. दरवर्षीपेक्षा यंदा दिवाळीत लालपरीतून दिवाळीच्या काळात प्रवास करणाऱ्यांची संख्या दुप्पटीने वाढली आहे.

    ९ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या बारा दिवसांत पुणे विभागातून १८ लाख ८७ हजार ६५२ नागरिकांनी एसटीतून प्रवास केला आहे. त्यात एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या शिवाई, शिवशाही, शिवनेरी, हिरकणी अशा विविध प्रकारच्या बसेस आहेत. प्रवाशांकडून लांबपल्ल्याचा प्रवास करताना स्लीपर बसला प्राधान्य दिले आहे. पुणे विभागातून राज्यातील सर्व भागात जादा गाड्या सोडण्यात आले होत्या. त्यात प्रवाशांना देण्यात आलेल्या सवलतीमुळे एसटीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

    विनासवलत प्रवास करणाऱ्यांची संख्याही जास्त होती. यंदा दिवाळीत १२ दिवसांत १८ लाख ८७ हजार ६५२ प्रवाशांनी प्रवास केला असून, पुणे विभागातील एसटीने ३६ लाख ५९ हजार १५३ किमीचा प्रवास केला आहे. त्यानुसार, महामंडळाच्या खात्यात तब्बल 23 कोटींचे उत्पन्न जमा झाल्याची माहिती दिली जात आहे.