245 crore MD drugs seized again in Sangli district; Action by Mumbai Police; Six persons detained with 122 kg of MD drugs

  कवठेमहांकाळ : इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथे शेतात निर्जनस्थळी एमडी ड्रग्ज निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत तब्बल २४५ कोटी रुपयांचा १२२.५ किलो ड्रग्ज निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या साठ्यासह मिक्सर, ग्रायंडर व अन्य मशिनरी जप्त केल्या. मुंबई गुन्हा अन्वेषण विभागाच्या युनिट सातच्या पथकाने ही कारवाई केली.याप्रकरणी जमीनमालक संशयित वासुदेव लक्ष्मण जाधव (वय ३२, रा. ढालेवाडी, ता. कवठेमहांकाळ) याच्यासह सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात दोन परप्रांतीय मजुरांचा समावेश आहे. कवठेमहांकाळ ग्रामीण भागातील आजवरची ही सर्वात मोठी कारवाई असल्याने खळबळ उडाली आहे.
  अधिक माहिती अशी, दीड महिन्यापूर्वी मुंबईतील कुर्लापोलिसांनी एमडी ड्रग्जचा तीन किलोंचा साठा जप्त केला होता. या प्रकरणाचा तपास करताना मुंबई पोलिसांनावरून) ‘इरळी कनेक्शन’ समोर आले होते. त्यानंतर कमालीची गुप्तता पाळत ही कारवाई करण्यात आली.
  ढालेवाडी ते डोर्ली रस्त्यालगत इरळीच्या हद्दीत संशयित
   वासुदेव जाधव याच्या शेतात द्राक्षबागेलगत असलेल्या गोदामामध्ये एमडी ड्रग्ज निर्मितीचा प्रकार सुरू असल्याची माहिती मुंबई येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती. यातील मुख्य सूत्रधार ठाणे येथील आहे. त्याची गेल्या १७ वर्षांपासून कवठेमहांकाळला ये-जा होती.मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस पथकाने रविवारी रात्रीपासूनच अत्यंत गोपनीयरित्या घटनास्थळी तपास सुरू ठेवला होता. इरळी, डोर्ली, ढालगाव व ढालेवाडी या चार गावांच्या सीमेलगतनिर्जनस्थळी हा कारखाना असल्याने या कारवाईचा कोणालाच थांगपत्ता लागला नव्हता.
  सोमवारी सकाळी ढालेवाडी येथील तरुण व्यायामाला जात असताना त्यांना घटनास्थळी पोलिसांची वाहने दिसली. त्यानंतर याबाबतची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना मिळाली. सोमवारी दिवसभर घटनास्थळी मुंबईतील गुन्हाअन्वेषणचे पोलिस, सांगली व कवठेमहांकाळचे पोलिस तळ ठोकून होते. दिवसभर या घटनेची कसून चौकशी करण्याचे काम सुरू होते.
  ड्रग्ज निर्मितीच्या कच्च्या मालासह मशिनरी जप्त
  यावेळी २४५ कोटी रुपयांच्या ड्रग्ज निर्मितीच्या कच्च्या मालासह मशिनरी पोलिसांनी जप्त केल्या. मुंबई गुन्हा अन्वेषण विभागाचे नीरज उबाळे, जतचे उपअधीक्षक सुनील साळुंखे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सतीश शिंदे, कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांचा मोठा ताफा यावेळी उपस्थित होता. मोठे रॅकेट असण्याची शक्यता इरळी येथील ड्रग्ज निर्मितीच्या कारखान्यातील मुख्य सूत्रधार ठाणे येथील असला तरी, ज्या ठिकाणी हा प्रकार सुरू होता, त्या जमिनीचा शेतमालक संशयित वासुदेव जाधव आहे.
  अल्पावधीत कोट्यवधी रुपयांची माया
  जाधवने अल्पावधित कोट्यवधी रुपयांची माया जमवली आहे. तो सुरुवातीला बेदाणा विक्रीचा व्यवसाय करत होता. या व्यवसायात नुकसान झाल्याने तो कर्जबाजारी झाला होता. पाच-सहा महिन्यांपूर्वी ८० लाख रुपये किमतीची चार एकर जमीन घेऊन या जागेतच सूत्रधाराच्या साथीने त्याने एमडी ड्रग्ज निर्मितीचा प्रकार सुरू केला होता. पोलिसांच्या या कारवाईनंतर वासुदेवचे कारनामे उघडकीस आले आहेत. दरम्यान, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.