बापरे! मंद्रूपच्या ठेकेदाराला पाणीपुरवठ्याची २५ कोटीची कामे ; किरकोळ खर्च वाढल्याने झेडपीने १४ कामे केली रद्द

    सोलापूर : जिल्हा परिषदेच्या (Solapur ZP)पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आलेली ९० कोटींच्या कामांबाबत संशय व्यक्त करण्यात आलेल्या असतानाच आता मंद्रूपच्या एकाच ठेकेदाराला पंचवीस कोटींची कामे वाटल्याचे दिसून आले आहे. झेडपीच्या पाणीपुरवठा विभागातर्फे जानेवारी ते जून या काळात केंद्र शासनाच्या जलजीवन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेच्या १८६ कामांचे टेंडर मंजूर करण्यात आले. सुमारे ९० कोटी खर्चाची दोनशे कामांचे टेंडर काढण्यात आले होते. यातील १८६ कामाचे टेंडर फायनल करण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी टेंडर मंजूर करताना मंद्रूपच्या आर के कंट्रक्शनलाच २५ कोटी ६२ लाख २२ हजार रुपयांची ३२ कामे मंजूर केली आहेत. तसेच निम्बर्गीच्या सूर्यकांत बिराजदार यांना सात कोटी ९५ लाख ७९ हजाराची दहा कामे मंजूर केली आहेत. एकाच ठेकेदारांना अनेक कामे मंजूर करण्यात आल्याने संशय बळावला आहे. वेगवेगळ्या तालुक्यात एकच ठेकेदार एकाच वेळी ही कामे कशी पूर्ण करेल असे आता बोलले जात आहे.

    न्यायालयात दाद मागणार..

    लोकशासन आंदोलन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरे यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितल्यानंतर आज सोमवारी अभिलेख पाहण्याच्या दिवशी त्यांना या मंजूर कामांची यादी दाखवण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी टेंडर मंजूर करताना एकच ठेकेदार व त्याने इतकी कामे करू शकतो का याचा विचार केलेला दिसत नाही त्यामुळे आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे दिंडोरे यांनी सांगितले.

    ४ हजारासाठी टेंडर मागे

    दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरुड येथील पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे खर्च केवळ 4 हजारने वाढल्याचे दाखवून टेंडर मागे घेण्यात आले आहे. अशी १४कामे रद्द करण्यात आली आहेत. मर्जीतील लोकांना कामे देण्यासाठीच झेडपीतील अधिकाऱ्यांनी हा खटाटोप केल्याचा आरोप दिंडोरे यांनी केला.