भात पिकाच्या भरपाईसाठी २५ लाख रुपये; मुळशी तालुक्यातील तब्बल ‘इतक्या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ

मुळशी तालुक्यातील ५५० शेतकऱ्यांना भात पिकाच्या नुकसान भरपाईपोटी २५ लाख रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे. यासाठी बॅंक खात्याचे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.

  पुणे : मुळशी तालुक्यातील ५५० शेतकऱ्यांना भात पिकाच्या नुकसान भरपाईपोटी २५ लाख रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे. यासाठी बॅंक खात्याचे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.

  मुळशी तालुक्यात नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात अवकाळी पावसाने झालेल्या १४१ हेक्टर क्षेत्रावरील भात पिकांचे नुकसान झाले होते. याबाबत तहसीलदार रणजित भोसले, तालुका कृषी अधिकारी हनुमंत खाडे यांच्या मार्गदर्शनातून महसूल, कृषी विभागाने त्वरित पंचनामे केले होते. नुकसान भरपाई मिळण्यासाठीचा अहवाल शासनास सादर केला होता. त्यानुसार मुळशीतील सुमारे ५५० शेतकऱ्यांना त्यांच्या बॅंक खात्यावर २५ लाख रुपयांची रक्कम जमा होणार आहे.

  यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांनी ही रक्कम मिळण्यासाठी आपल्या बॅंक खात्याचे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक असून यासाठी बॅंक खात्याला आधार क्रमांक संलग्न असणे आवश्यक आहे.

  बॅंक खात्याला आधार क्रमांक संलग्न असेल तर आधार प्रमाणीकरण करताना लगेचच शेतकऱ्यांच्या मोबाईलवर ओटीपी येईल व हा ओटीपी आधार प्रमाणीकरण करताना दिल्यावर लगेचच आधार प्रमाणीकरण झाले असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यानंतर नुकसान भरपाईचे पैसे बॅंक खात्यावर जमा होणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी जवळील महा ई सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्रांवर जाऊन ही प्रक्रीया पूर्ण करून घ्यावी.

  नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित ई केवायसी करून घ्यावी व काही समस्या उद्‌भवल्यास जवळील तलाठी यांची मदत घ्यावी.

  -रणजित भोसले, तहसीलदार, मुळशी