राज्यातील २५ टक्के सागरी किनारा जलमग्न; एससीएफचा अहवाल प्रकाशित

सॅटेलाइट प्रतिमांच्या आधारे संशोधकांना रायगड जिल्ह्यातील देवघरच्या किनारपट्टीचा ५५ हेक्टरचा भाग पाण्याखाली गेल्याचे आढळून आले आहे. देवघरच्या किनाऱ्याची धूप होत असल्याचे लक्षात आल्यानंतर गुगल अर्थ इंजिनचा वापर करून सॅटेलाइट डेटासेट्स गोळा केला. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीने किनाऱ्यावरील धूप या विषयाचे विस्तृत विश्लेषण केले.

  मुंबई : सॅटेलाईटच्या मदतीने संशोधनकर्त्यांनी रायगड (Raigad) जिल्ह्यातील देवघरजवळील सुमारे वानखेडे मैदानाच्या आकारापेक्षाही १० पट जास्त अर्थात ५.४ हेक्टर परिसर जलमग्न (Submerged) झाला आहे. ही फार चिंतेची बाब आहे. पुण्यातील सृष्टी कन्झर्व्हेशन फाऊंडेशनने (Srishti Conservation Foundation) १.५ किमी लांबीच्या सागरी किनारा (Sea Coast) क्षेत्रातील बाणकोट खाडीकिनाऱ्याचा अभ्यास करून १९९० आणि २०२२ दरम्यान खारफुटी (Mangroves), छोट्या खाड्या, ओलावा असलेली जमीन यासह सुमारे ५५ हेक्टर किनारपट्टीचे नुकसान झाले असून ३०० मीटर समुद्र किनारी क्षेत्र लुप्त झाले आहे. राज्यातील सुमारे २५ टक्के सागरी किनारा जलमग्न झाला आहे.

  समुद्राची पातळी वाढल्याने होणारी क्षार जमिन आणि किनारपट्टीची होणारी धूप या विषयावर धोरणकर्त्यांना धोरण ठरविण्यासाठी सहाय्य व्हावे यादृष्टीने संशोधन होत आहे. एससीएफ महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागावर सॅटेलाइट डेटासेट्स विकसित करुन तपशीलवार अहवाल तयार करत आहे. गेल्या वर्षी, मुंबई महानगर क्षेत्रालगत असलेल्या खाड्या व जलमार्गांची रुंदी कमी होण्यासंदर्भातील मूल्यमापन आणि करंजा खाडीलगतच्या ६० चौ. फुटांहून अधिक खारफुटीचे क्षेत्र आकुंचित झाल्याचा अहवाल एससीएफने प्रकाशित केला होता.

  सॅटेलाइट प्रतिमांच्या आधारे संशोधकांना रायगड जिल्ह्यातील देवघरच्या किनारपट्टीचा ५५ हेक्टरचा भाग पाण्याखाली गेल्याचे आढळून आले आहे. देवघरच्या किनाऱ्याची धूप होत असल्याचे लक्षात आल्यानंतर गुगल अर्थ इंजिनचा वापर करून सॅटेलाइट डेटासेट्स गोळा केला. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीने किनाऱ्यावरील धूप या विषयाचे विस्तृत विश्लेषण केले. त्यानुसार १९९० ते २०१८ या कालावधीत महाराष्ट्रातील २५.५ टक्के किनारपट्टीच्या भागाची धूप झाल्याचे मांडण्यात आले आहे.

  किनारपट्टीची धूप
  सॅटेलाइटने निश्चित केलेला किनारा ३०० ते ५०० मीटर जमिनीच्या बाजूला सरकला आहे, असे निरीक्षणाअंती दिसून आले. या व्यतिरिक्त किनारपट्टीची धूप झाल्यामुळे खारफुटी आणि सुरूची झाडेही उन्मळून पडली, असे एससीएफचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीपक आपटे यांनी सांगितले.

  गावांमध्ये शिरू लागले पाणी
  एकीकडे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे आणि दुसरीकडे किनारपट्टीच्या भागात वाळूचे उत्खनन केल्यामुळे किनाऱ्याचा नैसर्गिक चढ सपाट होत चालला आहे. त्यामुळे समुद्राचे पाणी गावांमध्ये अधिक वेगाने शिरु लागले आहे. खाडीची खोली सतत होत असलेल्या वाळूच्या उत्खनानामुळे वाढत आहे, त्यामुळे भरतीच्या व वादळाच्या वेळी अधिक पाणी वाहून क्षमतेमुळे किनाऱ्यावरील अनेक भाग क्षारयुक्त होत आहेत. देवघरमध्ये किनारपट्टीच्या भागाची धूप होण्यास पुलांचे बांधकाम व संबंधिक कामेही कारणीभूत आहेत, असे अभ्यासात आढळून आले आहे.