महा-ई-सेवा केंद्रातील सात-बारा उताऱ्यासाठी दर निश्चित; या सुविधेसाठी 25 रुपये दर आकारणार

  पुणे : सात-बारा उतारा आणि आठ-अ ची प्रत काढणे यासाठी नागरिकांकडून किती दर आकारवयाचा हे निश्चित नव्हते, अखेर शासनाने यासाठी दर निश्‍चित केले आहेत. सातबारा उताऱ्यावरील फेरफारविषयक सेवा आॅनलाइन पद्धतीने ई-हक्क प्रणालीद्वारे शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधेचा लाभ महा-ई-सेवा केंद्र, सेतू केंद्रातून घेता येत आहे. शासनाने या सुविधेसाठी 25 रुपये असा दर निश्चित केला आहे. यामुळे जादा शुल्क आकारण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे.
  सात-बारा उतारे आता डिजिटल स्वाक्षरीत
  सात-बारा उतारे आता डिजिटल स्वाक्षरीत उपलब्ध आहेत. त्यावर फेरफार घेण्याची प्रक्रिया संगणकीकृत आहे. अनोंदणीकृत दस्ताचे फेरफार म्हणजे सातबारा उताऱ्यावरील वारस नोंद, मयताचे नाव कमी करणे, बोजा दाखल अथवा कमी करणे, अपाक शेरा कमी करणे, विश्वस्थांचे नाव बदलणे आदी फेरफार नोंदविण्यासाठी खातेदार नागरिकांना तलाठी कार्यालयात अर्ज दाखल करावा लागत होता.
  केंद्र चालकांनी या सेवांसाठी 25रुपये घेण्याचे आदेश
  आता शासनाने ई हक्क प्रणाली विकसित करून या सर्व सुविधा आॅनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन ई-हक्क प्रणालीद्वारे तलाठ्याकडे दाखल करता येतो. शासनाने महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र, सेतू केंद्र आणि संग्राम केंद्र चालकांनी या सेवांसाठी 25रुपये घ्यावेत. जर अर्जाची कागदपत्रे दोन पेक्ष्ा जास्त पाने असेल तर प्रति पान दोन रुपये याप्रमाणे दर आकारावेत, असे आदेश शासनाने दिले आहेत.
  ई-हक्क प्रणालीचा वापर वाढण्यासाठी शासन प्रयत्नशील
  “ई-हक्क प्रणालीचा वापर वाढावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी या सुविधा महा–सेवा केंद्र आणि सेतू केंद्रांतून उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यासाठीचे दरही शासनाने निश्चित केले आहे. यामुळे पारदर्शकता येईल.”  – सारिता नरके, अतिरिक्त जिल्हाधिकारी, तथा ई-फेरफार प्रकल्पाच्या राज्य समन्व्यक