अवघ्या 4 दिवसांत समुद्र किनाऱ्यावरुन 250 किलोंचं कोट्यवधींचं ड्रग्ज जप्त, मुंबई बॉम्बस्फोटांनंतर पुन्हा एकदा कोकण किनारा चर्तेत

रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर गेल्या चार दिवसांत चरसची मोठी खेप पकडण्यात आलेली आहे. ज्याचं वजन 250 किलो इतकं असल्याचं सांगण्यात येतंय. हे ड्रग्ज पाकिस्तान आणि अफगाणिस्थान या देशातून आणण्यात आल्याचा संशयही व्यक्त करण्यात येतोय.

  मुंबई : रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर गेल्या चार दिवसांत चरसची मोठी खेप पकडण्यात आलेली आहे. ज्याचं वजन 250 किलो इतकं असल्याचं सांगण्यात येतंय. हे ड्रग्ज पाकिस्तान आणि अफगाणिस्थान या देशातून आणण्यात आल्याचा संशयही व्यक्त करण्यात येतोय. 14 ऑगस्ट रोजी समुद्रावर गस्त घालणाऱ्या सीमी कर विभागाच्या अधिकाऱ्यांना रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर 14 संशयास्पद पाकिटं सापडली आहेत. ज्यांचं वजन 12 किलो इतकं आहे. याची अधिक तापसणी केली असता हे उच्च प्रतीचं चरस असल्याचं समोर आलंय. त्यानंतर समुद्र किनाऱ्यांवर सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी लाडघर समुद्र तटावर 35 किलो, 16 ऑगस्ट रोजी रेळशी समुद्र किनाऱ्यावर 25 किलो तर कोलधार किनाऱ्यावर 132 किलो, 17 ऑगस्ट रोजी क्रीकमदून 14 किलो, 101 किलो आणि 22 किलो चरस जप्त करण्यात आलंय.

  आणखी ड्रग्ज सापडण्याची शक्यता 

  दापोली सीमा शुल्काच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आसपासच्या समुद्र किनाऱ्यांवर अद्यापही सर्च ऑपरेशन सुरु आहे. समुद्र किनाऱ्यावर जर संशयास्पद बॅगा सापडल्या तर संपर्क करण्याचं आवाहनही स्थानिकांना करण्यात आलेलं आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत 10 संशयितांवर पोलीस लक्ष ठेऊन असल्याचं सांगण्यात येतंय.

  पाकिटांवर अफगाणिस्थानचा उल्लेख 

  आत्तापर्यंतच्या कारवाईत रत्नागिरी जिल्ह्यातील सीमा शुल्क विभागाच्या कारवाईत किनाऱ्यांवर 222 किलो चरस तर पोलिसांनी 37 किलो गांजा जप्त केलाय. या पाकिटांवर अफगाणिस्थानचं नाव असल्याचं सांगण्यात येतंय. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यांवरही अशीच पाकिट सापडली होती. त्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासात रत्नागिरी पोलिसांनी गुजरात पोलिसांना संपर्क केलाय. ही पाकिटं समुद्र मार्गे आलीत की याचं परिसरात कुणी याची तस्करी करीत आहे, याचा तपास आता दोन्ही यंत्रणा मिळून करतायेत. यामुळं कोकणाचा किनारा पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात आलेला आहे.

  1993 च्या बॉम्बस्फोटावेळीही झाली होती चर्चा 

  1993 च्या मुंबई ब़म्बस्फोटावेळीही मुंबईत मोठ्या प्रमाणात आरडीएक्स कोकणाच्या समुद्र किनाऱ्यांवर उतरवण्यात आलेलं होतं. आता ड्रग्जच्या साठ्यानं पुन्हा एकदा हा किनारा चर्चेत आलाय. कोट्यवधींचं ड्रग्ज मिळाल्यानं तपास यंत्रणांची झोप उडालेली आहे.