
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात पर्यटन विकासाला बळ मिळालं आहे. गेल्या काही दिवसांत पर्यटनासाठी 28 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.
कल्याणः पायाभूत सुविधांसह सर्वसामान्य नागरिकांचा हॅप्पीनेस इंडेक्स वाढावा यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr Shrikant Shinde) यांच्यामुळे कल्याण (Kalyan) लोकसभा मतदारसंघात पर्यटन विकासाला बळ मिळालं आहे. गेल्या काही दिवसांत पर्यटनासाठी (Tourism) 28 कोटींचा निधी प्राप्त झाला असून यात दावडी येथे पक्षी अभयारण्य, मलंगगड परिसर सुशोभीकरण, पावशेपाडा तलाव आणि शिव मंदिर या स्थळांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात पर्यटनाला चालना मिळणार आहे. यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी राज्याच्या पर्यटन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद दर्शवित राज्याच्या पर्यटन विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी निधीची मंजुरी दिली आहे.
रस्ते, पाणी, सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन या पायाभूत सुविधांसह मतदारसंघातील नागरिकांना समाधानाचे आयुष्य जगता यावे. त्यांना मनोरंजनाची साधने उपलब्ध असावीत. त्यांचा हॅप्पीनेस इंडेक्स हा वरचा असावा या हेतून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्नशील असतात. त्यासाठी विविध शहरात नाट्यगृह, क्रीडा संकुल, कला दालन, मंदिर परिसर सुशोभीकरण असे अनेक प्रकल्प खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हाती घेतले आहेत. त्यातच कल्याण लोकसभा मतदारसंघात पर्यटन स्थळे विकसीत करण्यासाठी खासदार डॉ. शिंदे प्रयत्नशील होते.
गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या श्रीमलंग गड या धार्मिक आणि पर्यटन स्थळांकडे खासदार डॉ. शिंदे यांनी प्राधान्याने लक्ष दिले. येथे असलेले पाण्याचे दुर्भिक्ष्य संपवण्यासाठी त्यांनी पाणी योजना राबवण्यास सुरूवात केली. श्रीमलंग गडाचा पर्यटन विकासाअंतर्गत चेहरा मोहरा बदलण्यासाठी त्यांनी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार श्री मलंगगडाच्या पर्यटनाच्या अंगाने विकास करण्यासाठी 10 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यात गडाकडे जाणाऱ्या पायऱ्या, येथे संरक्षक कठडे यांची उभारणी केली जाते आहे. या पायऱ्या काळ्या दगडात बांधल्या जात आहेत. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील दुर्गाडी स्थळाच्या विकासासाठी अशाच प्रकारे सुमारे पाच कोटी रूपयांचा निधी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुराव्याने प्राप्त केला. तर मतदारसंघातील पावशेपाडा आणि कांबा येथील तलाव आणि शिव मंदिराच्या परिसर सुशोभिकरणासाठी तब्बल आठ कोटींची निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
नुकताच राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने डोंबिवली येथील दावडी डोंगरावर पक्षी अभयारण्य आणि जैवविविधता उद्यान विकसीत करण्यासाठी पाच कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीला प्रतिसाद देत मंत्री लोढा यांनी या निधीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे पर्यावरण आणि पक्षी प्रेमींची गेल्या अनेक वर्षांच्या मागणीला यश आले असून त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत.
कोणत्या कामासाठी किती कोटींचा निधी ?
· श्री मलंगवाडी परिसर सुशोभीकरण करणे -एकूण निधी – 10 कोटी
· मौजे कांबा येथे शासकीय जागेवर असलेल्या तलावाचे सुशोभीकरण करणे तालुका – कल्याण, जिल्हा – ठाणे -एकूण निधी – 5 कोटी
· कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याचे डागडूजी करणे -एकूण निधी -5 कोटी
· कांबा पावशेत येथील शिवमंदिर परिसर सुशोभीकरण करणे -एकूण निधी – 3 कोटी
· कल्याण तालुक्यातील डोंबिवली (दावडी) आणि भाल येथील पक्षी अभयारण्याचे सुशोभीकरण करणे -एकूण निधी – 5 कोटी