३. ५ रिश्टर स्केलच्या भूकंपाने हिंगोली हादरले! मध्यरात्री नागरिकांची पळापळ, परिसरात भितीचे वातावरण

मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. रविवारी (१९ नोव्हेंबर) रात्री जिल्ह्यातील तब्बल २० गावांमध्ये जमीन हादरली आहे. त्यामुळे मध्यरात्री नागरिकांची पळापळ झाली.

    मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. रविवारी (१९ नोव्हेंबर) रात्री जिल्ह्यातील तब्बल २० गावांमध्ये जमीन हादरली आहे. त्यामुळे मध्यरात्री नागरिकांची पळापळ झाली असून परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झालेली नाही. या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी होती, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

    रविवारी रात्री औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, येडुत, धामणी,वसई तर वसमत तालुक्यातील, वापटी, कुपटी, पांगरा शिंदे , कुरुंदासह जवळपास २० गावांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूगर्भातून गुढ आवाज येऊन अचानक जमीन हादरली. भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याने नागरिकांची पळापळ झाली.

    काही घरांमधील भाड्यांची पडझड झाली. त्यामुळे अनेकांनी भीतीपोटी संपूर्ण रात्र जागून काढली. या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने पोलीस व महसूल पथक या गावांमध्ये पाठवले असून नागरिकांनी घाबरून जाता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    मागील काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात जमिनीतून गुढ आवाज होत आहे. अधून-मधून जिल्ह्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसत आहे. अचानक जमीन हादरत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.