गुंतवणुकीच्या आमिषाने पावणे तीन काेटी रुपयांची फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गुंतवणुकीच्या आमिष दाखवत पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकासह चौघांची पावणे तीन कोटींची फसवणूक करण्यात आल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

    पुणे : गुंतवणुकीच्या आमिष दाखवत पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकासह चौघांची पावणे तीन कोटींची फसवणूक करण्यात आल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी फिरोज हसन शेख (वय ४९, रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अब्दुल हुसैन हसन अली नाईमआबादी (वय ५० , रा. लष्कर), शोएब मोईनुद्दीन आतार (वय ३८), अफिका शोएब आतार (वय ५५) खालिद मोईनुद्दीन आतार (वय ३९), माजिद उस्मान आतार (वय ५५, चौघे रा. बोपोडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोज शेख बांधकाम व्यावसायिक आहेत. शेख यांची आरोपींशी २०१८ मध्ये ओळख झाली होती. तेव्हा आरोपींनी त्यांची खासगी कंपनी असल्याची बतावणी शेख यांच्याकडे केली. कंपनीकडून आयात-निर्यात व्यवसाय करण्यात येत आहे. जमीन खरेदी विक्री व्यवसायात कंपनीने मोठी गुंतवणूक केल्याची बतावणी आरोपींनी शेख यांच्याकडे केली होती.

    आरोपींनी शेख यांना व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. अडीच वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीत गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे सांगून शेख यांच्यासह चौघांकडून दोन कोटी ७६ लाख रुपये घेतले. गुंतवणूक केल्यानंतर आरोपींनी परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेख यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे तपास करत आहेत.