नगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १००९ गावांतील ३ लाख १७ हजार हेक्टर पिकांचे नुकसान

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जून ते सप्टेंबर या कालावधीत तब्बल१ लाख ३६ हजार ६७७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. तर ऑक्टोबरच्या प्राथमिक अहवालानुसार त्यात १ लाख ९१ हजार १२६ हेक्टर क्षेत्राची भर पडणार आहे.

  शेवगाव : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जून ते सप्टेंबर या कालावधीत तब्बल१ लाख ३६ हजार ६७७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. तर ऑक्टोबरच्या प्राथमिक अहवालानुसार त्यात १ लाख ९१ हजार १२६ हेक्टर क्षेत्राची भर पडणार आहे. त्यानुसार आतापर्यंत १००९ गावातील तब्बल ३ लाख १७ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे ऑक्टोबर महिन्याचा अहवाल अंतिम नसल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.जून ते सप्टेंबरपर्यंत निधी मागणी २९१ कोटींवर पोहोचली आहे. ऑक्टोबरच्या अंतिम अहवालानंतर एकूण मागणी आकडा ५०० कोटींच्याही पुढे जाईल.

  जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत १४९.५ टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. मागीलवर्षीच्या तुलनेतही यंदा अतिवृष्टी झाली असून, महसूल विभागाने २३ ऑक्टोबरअखेर ७४५.७ मिमी पाऊस नोंदवला आहे. अतिवृष्टीमुळे खरिपाच्या मका, सोयाबिन, उडीद, कांदा, फुलपीके, तूर, कापूस, बाजरीसह भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले. ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी कार्यालयांमार्फत जूनपासून पंचनामे करण्यात आले. ऑक्टोबर महिन्याच्या प्राथमिक अहवालात १ लाख ९१ हजार १२६ हेक्टर नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार केला. परंतु, ऑक्टोबर महिन्यातील पंचनाम्यांना उशिर झाल्याने, अंतिम अहवाल तयार होऊ शकला नाही. ऑक्टोबरसाठीची अपेक्षित मागणीची रक्कम निश्चितीस विलंब झाला आहे.

  २९१ कोटींपैकी ४.२५ कोटी निधी प्राप्त
  कृषी विभागाने नोंदवलेल्या अहवलात महिनानिहाय झालेल्या नुकसानीसह अपेक्षीत निधी मागणी मागणीही नोंदवली आहे. त्यानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या नुकसानीपोटी तब्बल २९१ कोटी २५ लाखांची मांगणी नोंदवली. शासनाकडून जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या झालेल्या नुकसानीपोटी ४ कोटी २५ लाख ९२ हजारांचा निधी प्राप्त झाला आहे. ऑक्टोबरचा अंतिम अहवाल आल्यानंतर पुन्हा सुमारे २५० कोटी निधीची गरज भासणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात नुकसानी पोटी मदतीचा आकडा ५०० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

  जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले, जून ते सप्टेंबरपर्यंतचा अहवाल अंतिम झाला असून ऑक्टोबर अहवालाचे काम प्रगतीपथावर आहे. केवळ चार ते पाच तालुके बाकी आहेत. परंतु, शुक्रवारपर्यंत (११ नोव्हेंबर) अहवाल अंतिम होण्याची अपेक्षा आहे.''

  रविंद्र माने, उपसंचालक, कृषी विभाग.

  शेतात अजुनही पाणी तसेच दलदलीची स्थिती असल्याने जिल्ह्यात खोळंबल्या रब्बी हंमागाच्या पेरण्या
  जिल्ह्यात २३ ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरूच होता. पाऊस थांबून पंधरा दिवस उलटले तरी शेतजमिनीत अजुनही पाणी तसेच दलदलीची स्थिती आहे. निचरा होणाऱ्या जमिनीत वाफसा होऊन पेरणी सुरू झाली, परंतु, काळ्या कसदार व पक्क्या जमिनीत अजूनही पेरणीपूर्पाव मशागतीला गती आलेली नाही. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.