3 lakh 93 thousand fines were collected on 397 vehicles in Lok Adalat campaign; Initiative of Baramati Traffic Branch and Pune District Legal Services Authority

  बारामती : बारामती वाहतूक शाखा व पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या वाहनांसाठी ५० टक्के सवलतीत दंड वसुलीची ‘लोकअदालत’ मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेत ३९७ वाहनांवरील ३ लाख ९३ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

  ई-चलन मशीनद्वारे दंड

  वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना ई-चलन मशीनद्वारे दंड झालेल्या वाहनांना ५० टक्के रकमेच्या सवलतीत दंड भरण्याची मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. दि.८ व १० एप्रिल सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत येथील बारामती वाहतूक शाखा नवीन इमारत (बारामती हॉस्पिटलजवळ) ही लोकअदालत पार पडली. दि.८ रोजी १२८ ई-चलन खटल्यांचे १ लाख ३३ हजार तर दि.१० रोजी २६९ ई-चलन खटल्यांचे २ लाख ६० हजार ७०० असे एकूण ३९७ ई-चलन खटल्यांचे एकूण ३ लाख ९३ हजार ७०० रुपये दंड स्वरूपात वसुल करण्यात आले आहेत.

  ऑनलाईन दंडाची रक्कम सवलतीत भरली

  बारामती, दौंड, इंदापूर परिसरातील वाहन चालक व मालकांनी या मोहिमेत सहभाग घेऊन आपल्या ऑनलाईन दंडाची रक्कम सवलतीत भरली. त्यांना ५० टक्के सवलत देण्यात आली. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा वाचला. ही सुविधा बारामती येथे सुरु करण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मोटार वाहन न्यायालय शिवाजीनगर पुणे येथील न्यायाधीश एस.एच. वानखडे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष गिरिगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी विशेष प्रयत्न केले. बारामती वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार, पुणे न्यायालयातील न्यायालयीन कर्मचारी सुधीर वानखडे, विक्रम पाठक, प्रकाश कुकडे, नितीन गायकवाड, विजय चव्हाण या मोहिमेच्या कार्यवाहीसाठी उपस्थित होते.

  ‘लोकअदालतची तारीख ही जुलै महिन्यात गेल्याने सध्या लोकअदालत स्थगित करण्यात आली आहे. नागरिकांचा प्रतिसाद पाहता आणखी प्रकरणे प्रलंबीत असल्याचे निदर्शनास येते. लोकअदालत सुरु झाल्यानंतर नागरिकांना त्याबाबत कळवण्यात येईल. त्यावेळी दंडाची रक्कम भरता येईल. – चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक