आठ गावठी पिस्तूल, दहा जिवंत काडतुसांसह तिघांना अटक; ‘एलसीबी’ची कारवाई

श्रीरामपूर शहरात विक्री करण्याच्या उद्देशाने आणलेले आठ गावठी पिस्तूल आणि दहा जिवंत काडतुसे जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा पाेलिसांनी जप्त केली आहेत.

    अहमदनगर : श्रीरामपूर शहरात विक्री करण्याच्या उद्देशाने आणलेले आठ गावठी पिस्तूल आणि दहा जिवंत काडतुसे जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा पाेलिसांनी जप्त केली आहेत. अहमदनगर जिल्ह्यात अलीकडच्या काळात हस्तगत केलेला सर्वात माेठा हा अग्नी शस्त्रसाठा आहे. पाेलिस अधीक्षक मनाेज पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक अनिल कटके यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली.

    राहुलसिंग फत्तुसिंग कलानी (वय २५), आकाशसिंग बादलसिंग जुनी (वय २२) आणि अक्षयसिंग तिलकसिंग कलानी (वय २२, रा. श्रीरामपुर बाजारतळ, गुरुगोविंदसिंग नगर, वॉर्ड क्रमांक तीन, ता. श्रीरामपूर) या तिघांना अटक केली आहे.

    स्थानिक गुन्हे शाखा पाेलिसांना श्रीरामपूरमध्ये अवैध शस्त्रसाठा विक्री हाेणार असल्याची माहिती मिळाली हाेती. पाेलिस निरीक्षक कटके यांच्या नेतृत्वाखाली सापळा लावून या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या अंगझडतीत आठ गावठी पिस्तूल आणि दहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

    श्रीरामपूरमधील हॉटेल राधिकाचे पार्किंगमध्ये दाढी वाढलेले तीन व्यक्ती संशयरित्या टेहळणी करत हाेते. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखा पाेलिसांनी खात्री केली. त्यानंतर तिघांभाेवती घेराव घातला. पाेलिसांनी घेराव घातल्याची चाहूल लागताच हे तिघे पळून जावू लागले. यानंतर पळापळी झाली. पाेलिसांनी शिफातीने पाठलाग करत या तिघांना ताब्यात घेतले.

    सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहायक फाैजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पाेलिस कर्मचारी बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पाेलिस नाईक भीमराज खर्से, शंकर चौधरी, सुरेश माळी, रवि सोनटक्के, मयुर गायकवाड, सागर ससाणे आणि चंद्रकांत कुसळकर हे कारवाईत सहभागी झाले हाेते.