
खाजगी रुग्णालय सुरु ठेवण्यासाठी बॉम्बे नर्सिंग होमची (Bombay Nursing Home) परवानगी असणे आवश्यक असते. परंतु, अनेक वर्षांपासून येथील खाजगी डॉक्टरांनी परवानगी न घेता सर्रास आपली रुग्णालय सुरू ठेवली होती.
संभाजीनगर : खाजगी रुग्णालय सुरु ठेवण्यासाठी बॉम्बे नर्सिंग होमची (Bombay Nursing Home) परवानगी असणे आवश्यक असते. परंतु, अनेक वर्षांपासून येथील खाजगी डॉक्टरांनी परवानगी न घेता सर्रास आपली रुग्णालय सुरू ठेवली होती. तालुक्यातील खाजगी रुग्णालय तपासणीची मोहीम ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षक डॉ. स्मिता कन्नाके यांच्या नेतृत्वात सुरुवात केली.
त्यावेळी डॉ. भट्टड, डॉ. दुधे, डॉ बुधवंत यांच्या खाजगी रुग्णालयात बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट तसेच फायर परवानगीचे कागदपत्र आढळून आली नाहीत. त्यामुळे जोपर्यंत परवानगी मिळत नाही, तोपर्यंत हे दवाखाने बंद करण्याचे आदेश डॉ. स्मिता कन्नाके यांनी दिले.
कारंजा तालुका ग्रामीण भागाशी मोठ्या प्रमाणात जोडला असून, तालुक्यात जवळपास 80 खेडी जोडली आहेत. कारंजामध्ये जवळपास पाच ते सहा खाजगी रुग्णालये आहेत. त्यापैकी तीन खाजगी रुग्णालय चालक डॉक्टरांकडे परवानगीच नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
कारंजा येथील खाजगी रुग्णालयाची तपासणी करण्याचे आदेश ग्रामीण रुग्णालय कारंजा घाडगे प्राप्त झाले. त्यांच्या आदेशानुसार, टीमने खाजगी रुग्णालय तपासणीला सुरुवात केली. रुग्णालयाची तपासणी केली असता काही रुग्णालयांनी अजूनपर्यंत प्रशासनाची कोणतीच परवानगी घेतली नाही. तर काही खाजगी रुग्णालयांची परवानगीची मुदत संपूनसुद्धा त्यांनी नुतनीकरण केलेले नाही. त्यामुळे डॉ. भट्टड, डॉ. दुधे, डॉ बुधवंत यांचे गुरुमाऊली यांच्या खाजगी रुग्णालयाला तात्पुरते बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच जोपर्यंत प्रशासनाची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत रुग्णालय बंद ठेवावी जर ही रुग्णालय सुरू दिसली तर त्याला सील करावे लागेल, अशी प्रतिक्रिया ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षक डॉ. स्मिता कन्नाके यांनी दिली.