3 तरुणांच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीची आत्महत्या; चिठ्ठीत तिघांचा उल्लेख, नेमकं काय घडलं?

सिन्नर तालुक्यातील शहा येथे श्री भैरवनाथ हायस्कूल मध्ये दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या सतरा वर्षीय मुलीने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी ( दि. 22) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास उघडकीस आला. या मुलीने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गावातील तीन तरुणांकडून त्रास होत असल्याचे नमूद केले होते.

    सिन्नर तालुक्यातील शहा येथे श्री भैरवनाथ हायस्कूल मध्ये दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या सतरा वर्षीय मुलीने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी ( दि. 22) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास उघडकीस आला. या मुलीने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गावातील तीन तरुणांकडून त्रास होत असल्याचे नमूद केले होते. तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून वावी पोलीस ठाण्यात तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी ‘त्या’ तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे.

    वैष्णवी नवनाथ जाधव असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. ती शहा गावातील श्री भैरवनाथ हायस्कूल येथे दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. दोन दिवसांपूर्वी शाळेच्या परिसरात टवाळखोरी करत मुलींना त्रास देणाऱ्या गावातील तिघांसोबत तिचा वाद झाला होता. या तिघा तरुणांनी घरी येत तिचे वडील नवनाथ जाधव यांना तिच्याबद्दल वाईट साईट सांगून त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की देखील केली होती. गावातील काही ग्रामस्थांनी हे भांडण सोडवत त्या मुलांना समज देऊन जायला सांगितले होते. मात्र हे तीनही मुले गुंड प्रवृत्तीची असल्यामुळे व शाळेच्या परिसरात मुलींची छेडछाड करणे, त्यांना त्रास देणे असे प्रकार नेहमीच करत असल्यामुळे ते आपल्याला व कुटुंबीयांना पुन्हा त्रास देतील या भीतीने घाबरलेल्या वैष्णवीने सोमवारी रात्री घरातील सर्वजण झोपी गेल्यानंतर छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.

    शाळेच्या गणवेशातील लेगीज पॅन्ट फाडून तिने दोरी बनवली व घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास तिचे चुलते जालिंदर हे एमआयडीसीतून कामावरून घरी परतल्यावर लक्षात आला. वैष्णवी, तिचा लहान भाऊ योगेश व चुलता घराच्या बैठक खोलीत झोपायचे. तर आई वडील बाजूच्या खोलीत झोपायचे. भाऊ योगेश हा पिठाच्या गिरणीत उशीर झाल्याने तेथेच थांबला होता. वैष्णवी खोलीचा दरवाजा उघडत नसल्याने जालिंदरने नवनाथ व वहिनी सुनीता यांना उठवले. या सर्वांनी दरवाजा उघडण्यासाठी वैष्णवीला आवाज दिला. मात्र प्रतिसाद येत नसल्याने जालिंदरने पहारीच्या साह्याने दरवाजा तोडला. यावेळी वैष्णवी ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. गावातील स्थानिक डॉ. निलेश शिरसाठ यांनी तपासून वैष्णवी मृत झाल्याचे सांगितले.

    वैष्णवीने लिहिलेली चिठ्ठी

    मी जीव देण्याचं कारण फक्त वैभव गोराणे. हा खूप नालायक मुलगा आहे. तो आतापर्यंत खूप मुलींसोबत नालायक वागला. त्यातलीच मी पण एक आहे. माझ्यासोबत पण खूप घाण वागलाय. आणि आता… हिच्या सोबत वागतोय. त्याला शिव्या देण्याचं कारण आहे की तो लोकांना माझ्याविषयी नको ते वाईट बोलायचा. अंकुश धुळसैंदर, (अल्पवयीन असल्याने नाव प्रसिद्ध केलेले नाही) हे दोन त्याचे मित्र प्रत्येक घाण वागणुकीला मदत करत होते. आणि हा दोन चिठ्ठ्या घेऊन माझ्या दारात येऊन माझ्या वडिलांची गच्ची धरणारा हा कोण! आणि माझ्याकडे याच्याविषयी शंभर पुरावे असते पण मला माहीत नव्हतं हा इतका नालायक मुलगा आहे. यात माझी पण चूक होती आणि मला माहीत होतं की हे माझ्या वडिलांना कळल्यावर ते मला मारतील. त्यामुळे मी आत्महत्या केली आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त याचे दोन मित्र आणि हा आहे. आणि या गोराणे टीमला मुळापासून नाही संपवलं तर शहा गावात हे होत राहणार. आणि श्री भैरवनाथ हायस्कूलमध्ये पण असेच आत्ता उद्योग होत आहेत.