नांदेडमध्ये 31 आता संभाजीनगरमध्येही 10 रुग्ण दगावले; 41 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?, आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात

नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या 24 तासांत दर तासाला एक म्हणजेच 24 रुग्णांचा मृत्यू (Patient Died) झाला. त्यात गंभीर बाब म्हणजे मृतांमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश आहे.

  संभाजीनगर : नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या 24 तासांत दर तासाला एक म्हणजेच 24 रुग्णांचा मृत्यू (Patient Died) झाला. त्यात गंभीर बाब म्हणजे मृतांमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश आहे. आता ही संख्या 31 वर गेली आहे. नांदेडमध्ये ही दुर्दैवी घटना घडली असताना आता छत्रपती संभाजीनगरमधून (Sambahji Nagar) धक्कादायक बातमी समोर आली आहे. संभाजीनगरमध्येही 10 रुग्ण दगावले आहेत.

  राज्यभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवत आहे. वेळेवर औषधी न मिळाल्यानेच रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रुग्णालयाची दररोजची ओपीडी साधारणतः दोन हजारांवर आहे. या ठिकाणी नांदेडसह हिंगोली, परभणी, यवतमाळ, वाशिम आणि शेजारील तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. रुग्णांची संख्या वाढत असताना औषधांच्या तुटवड्याचा विषयही गंभीर होत चालला आहे. आजही रुग्णांना बाहेरून औषधी आणण्याचा सल्ला दिला जातो. रुग्णालयात अत्यावश्यक औषधी नसल्यामुळे शेजारील जिल्ह्याच्या रुग्णालयात एक्स्पायरी डेट संपत असलेल्या औषधींचा साठा असल्याचे समोर आले आहे.

  घाटी रुग्णालयात मागच्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 10 मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश आहे. शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूचं लोण छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचलं आहे. घाटी रुग्णालायत ज्या रुग्णांचा मृत्यू झाला, त्यांना बाहेरच्या रुग्णालयातून रेफर करण्यात आलं होतं, अशी माहिती आहे.

  …तर ही परिस्थिती आली नसती

  जितकी कार्यक्षमता स्वत:च्या प्रचारासाठी, विरोधी पक्ष फोडण्यासाठी वापरता, तितकी कार्यक्षमता जर कामाप्रती दाखवली असती तर ही परिस्थिती आली नसती.

  – जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार गट)

  सरकारी अनास्थेचे बळी

  ठाण्यात झालेल्या घटनेने सरकार आणि सरकारी यंत्रणा काहीही शिकलेली नाही. 12 नवजात मुलांचा मृत्यू एका अर्थाने सरकारी अनास्थेचा बळी आहे.

  – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद.

  ट्रिपल इंजिन शिंदे सरकार जबाबदार

  महाराष्ट्रातील खोके सरकार फक्त ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, घर फोडा, पक्ष फोडा यांच्यात व्यस्त असतात. यामुळे ते सर्वसामान्य जनतेपासून दूर आहे. या सगळ्या 24 मृत्यूला हे ट्रिपल इंजिन शिंदे सरकार जबाबदार आहे.

  – सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस