महिन्यात ३१४ जणांना मोकाट कुत्र्यांचा चावा, हल्ल्यांचे वाढते प्रमाण गंभीर; बंदोबस्त करण्याची मागणी

मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करण्याचे काम महापालिकेकडून सुरुच आहे, मात्र संख्या कमी होत नाही. परिणामी नागरिकांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. महिनाभरात जवळपास ३१४ जणांचे लचके मोकाट कुत्र्यांनी तोडले आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

  सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. ग्रामीण भागातील कुत्री पकडून ती महापालिका क्षेत्रात सोडण्यात येत आहेत. त्यामुळे महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करण्याचे काम महापालिकेकडून सुरुच आहे, मात्र संख्या कमी होत नाही. परिणामी नागरिकांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. महिनाभरात जवळपास ३१४ जणांचे लचके मोकाट कुत्र्यांनी तोडले आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
  महापालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणामध्ये आणण्यासाठी अनेक उपाययोजना सुरु केल्या आहेत. आवश्यक डॉग व्हॅनसह कर्मचाऱ्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे. पकडलेल्या मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यात येत आहे. गत वर्षभरामध्ये हजारांवर कुत्र्यांची नसबंदी केली आहे. स्वच्छतेवरही भर दिला आहे. वेळेत कचरा उठाव करण्यात येतो, तरीही मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणामध्ये येत नसल्याचे चित्र आहे.
  वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
  शहरातील प्रत्येक चौक, उपनगरामध्ये झुंडीने फिरणारे मोकाट कुत्रे लोकांवर हल्ले करतात. त्यामुळे नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिलांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. महिनाभरामध्ये जवळपास ३१४ जणांचे मोकाट कुत्र्यांनी लचके तोडले आहेत. यामध्ये अनेक जण गंभीर झाले. काही जण कायमचे जायबंदी झाले आहेत. दरम्यान कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे, महापालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

  महापालिका क्षेत्रातील मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यात लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांवरील हल्ले सुरुच आहेत. कुत्र्यांची संख्या नियंत्रणामध्ये आणण्यासाठी महापालिकेकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. पण चिकन, मटण, मासे विक्रेते, हॉटेल वेस्टवर नियंत्रण नाही. रस्त्यांवर कचरा टाकला जातो. अशा हॉटेलचालक, विक्रेत्यांवर कारवाई करावी. अन्यथा मोकाट कुत्री पकडून ती महापालिकेत सोडू.

  - मनोज भिसे, अध्यक्ष लोकहित मंच.