मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला ३५ लाखांचा डीजे अन् स्क्रीन; ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमावर उधळपट्टी

सोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने डीजे व स्क्रीन लावण्यासाठी ३५ लाखांची उधळपट्टी केली आहे.

    सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने डीजे व स्क्रीन लावण्यासाठी ३५ लाखांची उधळपट्टी केली आहे.

    जिल्ह्यातील दुष्काळाबाबत शेतकऱ्यांची ओरड होत असतानाच जिल्हा प्रशासनाने सरकारचे मार्केटिंग करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा जिल्हास्तरीय उपक्रम घेण्यासाठी फक्त स्क्रीन व डीजे लावण्यासाठी चक्क ३५ लाखाचे टेंडर काढले आहे. राज्यात सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या सरकारने शासन आपल्या दारी हा उपक्रम घेतला. सर्वसामान्यांची सरकारी कार्यालयात अडलेली कामे व्हावी, असा उद्देश दाखवून या कार्यक्रमाचे मार्केटिंग केले जात आहे. या उपक्रमातून किती जणांना फायदा झाला हा भाग निराळा असला तरी या उपक्रमावर सरकार करत असलेला खर्च मात्र प्रचंड असल्याचे दिसून येत आहे.

    सध्या सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही. शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगितले जात आहे. तरीपण जिल्हा प्रशासनाने शासन आपल्या दारी हा जिल्हास्तरावरील उपक्रम घेण्याचा घाट घातला आहे. या कार्यक्रमावर चक्क स्क्रीन व डीजेसाठी ३५ लाखांची उधळपट्टी करण्यात येणार आहे. केवळ एका कार्यक्रमासाठी काही तासापुरते स्क्रीनवर डीजेसाठी इतके मोठे भाडे गृहीत धरण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे इतक्या किमतीत डीजे व स्क्रीन प्रशासनाला विकत घेणेच शक्य आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमावर उधळपट्टी करण्याऐवजी शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी होत आहे.

    बांधकाम ठेकेदाराला निविदा

    जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पदभार घेतल्यापासून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणाऱ्यावर भर दिला आहे. अशात जिल्हास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता सु. गुजरे यांनी ऑनलाइन टेंडर जारी केले आहे. २६ ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीसाठी टेंडर भरण्याला मुदत होती. सहा नोव्हेंबर रोजी ही निविदा उघडण्यात येणार आहे. या निविदेसाठी फक्त बांधकाम विभागातील ठेकेदारालाच मान्य करण्यात आले आहे. बांधकाम ठेकेदार स्क्रीन व डीजेची यंत्रणा कशी राबवू शकतात? कोणत्यातरी ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून अशी अट घालण्यात आल्याची चर्चा बांधकाम विभागात रंगली आहे.

    शेतकऱ्यांना मदत करावी

    एलईडी सेटसाठी १९ लाख ९ हजार तर डीजे सेटसाठी १५ लाख ७२ हजार ७१६ रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. इतक्या किंमतीत या दोन्ही यंत्रणा विकत घेता येऊ शकतात असे मार्केटमधून सांगितले जात आहे. केवळ दोन यंत्रणासाठी ३५ लाख तर मंडप, जेवणावळी व इतर खर्च किती? असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. दुष्काळी परिस्थितीत शासनाच्या असल्या कार्यक्रमावर होणारी उधळपट्टी करण्याऐवजी शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.