बारामती शहरात ३७५ फूट तिरंगा पदयात्रा उत्साहात; विद्यार्थी परिषदेकडून आयोजन

  बारामती : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बारामतीकडून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज (दि. १८ ऑगस्ट) ३७५ फूट भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
  तिरंगा पदयात्रेची सुरुवात बारामतीमधून सुरुवात
  या तिरंगा पदयात्रेची सुरुवात बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय (टी. सी. कॉलेज) येथून मोठ्या उत्साहात करण्यात आली. तिरंगा पदयात्रा टी.सी. कॉलेज, व्हील कॉलनी, तारा टॉकीज, कदम चौक, गांधी चौक, भिगवण चौक, तीन हत्ती चौक, अशा पद्धतीने संपूर्ण शहरातून या तिरंगा पद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तिरंगा पदयात्रेचे बारामतीकरांनी भारत मातेचे पूजन व पुष्पवर्षाव करून ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
  भारत मातेचे पूजन व पुष्पवर्षाव
  बारामती शहरातील तीन हत्ती चौक येथे पादयात्रेचा समारोप करण्यात आला. समारोपाच्या कार्यक्रमप्रसंगी पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना पोलीस अधीक्षक इंगळे यांनी मार्गदर्शन केले.
  देशभावना जागृत ठेवून कर्तव्यदक्ष
  यावेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी देशभावना जागृत ठेवून कर्तव्यदक्ष नागरिक होण्याचा प्रयत्न करावा, विद्यार्थी परिषदेच्या या उपक्रमामुळे बारामती शहरांमध्ये देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले असून असे उपक्रम नेहमी व्हायला हवेत. आमचे सहकार्य व शुभेच्छा असतील, असे मत यावेळी पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांनी व्यक्त केले.
  विकास यात्रेचा आराखडा
  यावेळी जिल्हा संयोजक श्रेयस प्रभुणे यांनी पुढील काळात होणाऱ्या उद्योजक विकास यात्रेचा आराखडा मांडला. शहर मंत्री श्रावणी बाचल यांनी प्रास्ताविक केले. सहसंयोजक मयूर भापकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला शहरातील विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.